ISL 2018: युवा खेळाडू ठरत आहेत लक्षवेधी

गेल्या वर्षी भारताने 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. त्या भारतीय संघातील अनेक खेळाडू भावी स्टार असल्याचा उल्लेख अनेकांनी केला. त्या संघात इतके प्रतिभासंपन्न खेळाडू होते की एकही गुण मिळाला नसताना त्यांनी मने मात्र नक्कीच जिंकली.

हे खेळाडू स्टार बनतील असे बहुसंख्य तज्ञांना वाटत होते. काही खेळाडूंनी 19 वर्षांखालील संघातून वाटचाल कायम ठेवली. अनेकांना हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) करार मिळाले. आता वर्षभरात काही जणांनी आपापल्या फ्रँचायजीकडून मुख्य संघात स्थान मिळविले आहे. यात धीरज सिंग मोईरंगथेम, महंमद रकिप, महंमद नवाझ, कोमल थातल आणि शुभम सारंगी यांचा समावेश आहे.

उत्साह दुणावणारी बाब म्हणजे धीरज आणि रकीप यांनी केरळा ब्लास्टर्सच्या आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांत भाग घेतला असून त्यांच्या खेळाला चांगली दाद मिळाली आहे. धीरज हा 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत उदयास आलेला एक स्टार ठरला.

डेव्हिड जेम्स मार्गदर्शक असलेल्या ब्लास्टर्स संघासाठी धीरज हा उत्तम गोलकिपर ठरला आहे. पहिल्याच सामन्यात त्याने क्लीन-शीट राखली. त्यानंतर प्रांजल भुमीजने लांबून मारलेल्या फटक्यावर तो चकला.

मुंबई एफसीकडून चमकलेला प्रांजल हा आणखी एक तरुण खेळाडू आहे. धीरजने युरोपमध्ये प्रशिक्षण घेतले असून त्याने दोन सामन्यांत सहा शॉट्स अडविले आहेत. दोन्ही सामन्यांत त्याने हिरो आयएसएल सामनावीर हा किताब मिळविला.

जेम्स यांनी सांगितले की, ”धीरज 18 वर्षांचा आहे. त्याने 17 व 19 वर्षांखालील संघातून आगेकूच केली आहे. आता तो मुख्य संघाकडून खेळतो आहे.”

रकीप हा 17 वर्षांखालील स्पर्धेसाठी संभाव्य संघात होता. त्याचे अंतिम संघातील स्थान थोडक्यात हुकले. त्याने सुद्धा ब्लास्टर्सकडून चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही सामन्यांत तो राईट-बॅक म्हणून खेळला. त्याने बचाव फळीत आपले अस्तित्व जाणवून दिले. दोन सामन्यांत त्यांच्याविरुद्ध एकच गोल झाला आहे आणि तो सुद्धा लांब अंतरावरून झाला.

एफसी गोवा संघाचा गोलकिपर महंमद नवाझ हा चमकलेला आणखी एक खेळाडू आहे. रकीप याच्याप्रमाणेच नवाझ सुद्धा 17 वर्षांखालील स्पर्धेसाठी अंतिम संघात स्थान मिळवू शकला नाही. आयएसएलमध्ये मात्र त्याने भरारी घेतली आहे. अनुभवी सहकाऱ्यांच्या तुलनेत त्याला पसंती देण्यात आली. त्याने पहिल्या सामन्यात चूक केली, पण नंतर काही चांगले शॉट्स अडविले. त्यामुळे तो प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांच्या विश्वासाला पात्र ठरला.

लॉबेरा यांनी सांगितले की, ”वय कितीही असले तरी सर्वोत्तम गोलकिपरची निवड करू. प्रशिक्षक म्हणून मी नवाझची निवड केली. तो सर्वाधिक तंदुरुस्त होता. मी 18 वर्षांचा होतो तेव्हा मी नवाझ याच्यापेक्षा जास्त चुका करायचो.”

दिल्ली डायनामोजने आणखी एका तरुण खेळाडूला संधी दिली. त्याचे नाव शुभम सारंगी. 17 वर्षांखालील विश्वचषकासाठी त्याची निवड थोडक्यात हुकली. या स्ट्रायकरने प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांना प्रभावित केले आहे. त्यामुळे तो बदली खेळाडू म्हणून उतरू शकला.

अॅटलेटिको दी कोलकातामध्ये कोमल थातल संधीच्या प्रतिक्षेत आहे. तो 17 वर्षांखालील विश्वकरंडक संघात होता. त्याने प्रशिक्षक स्टीव कॉपेल यांना मोसमपूर्व शिबीरात प्रभावित केले. तो लवकरच कोलकाताकडून खेळण्याची अपेक्षा आहे.

एकूण काय तर आयएसएलमधील हा काळ तरुण खेळाडूंसाठी चांगला ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

त्यावेळी आम्ही पृथ्वी शॉच्या १० टक्केही आसपास नव्हतो – विराट कोहली

ISL 2018: दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघांचा सुरू आहे संघर्ष

टीम इंडियात संधी तर मिळाली, त्याच दिवशी सामना जिंकल्यामुळे त्या दोन खेळाडूंना परतावे लागले पुन्हा घरी