ISL 2018: दोन गोलच्या पिछाडीवरून जमशेदपूरची दिल्लीवर मात

जमशेदपूर । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसीने दोन गोलांची पिछाडी भरून काढत दिल्ली डायनॅमोजवर 3-2 असा आश्चर्यकारक विजय मिळविला. जेआरडी टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर कालू उचेने पुर्वार्धात दोन मिनीटांत दोन गोल करीत दिल्लीला सनसनाटी सुरवात करून दिली, पण त्यानंतर यजमान जमशेदपूरने प्रतिआक्रमण रचले. चार मिनीटे बाकी असताना त्रिंदादे गोन्साल्वीस याने केलेला गोल निर्णायक ठरला.

दिल्लीच्या धडाक्यानंतर टिरीने जशेदपूरचे खाते उघडले. उत्तरार्धात युमनाम राजूने त्यांना बरोबरी साधून दिली. मग 86व्या मिनीटाला वेलींग्टन प्रिओरीने त्रिंदादेला अचूक पास दिला. त्रिंदादेने तोल सावरत वेगवान फटका मारला. चेंडू दिल्लीचा बदली खेळाडू प्रतिक चौधरीच्या दोन पायांमधून आल्याने गोलरक्षक अर्णब दास शर्माचा अंदाज चुकला आणि जमशेदपूरचा गोल झाला. हाच गोल निर्णायक ठरला.

सामन्याची सुरवात वेगवान झाली. आठव्या मिनीटाला गॅब्रीएल चिचेरोचा पास चुकल्यामुळे चेंडू जेरी माहमिंगथांगा याच्याकडे गेला. तो आगेकूच करू लागताच जेरॉन लुमूने त्याला पाठीमागून पाडले. त्यावर पंचांनी केवळ फ्रि-कीक दिली. दिल्लीच्या सुदैवाने ती वाया गेली. 11व्या मिनीटाला चिचेरोने बॉक्समध्ये मारलेला चेंडू जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉलने पुढे येत थोपविला, पण चेंडू नंदकुमार शेखर याच्यापाशी गेला. शेखरने नेटच्या दिशेने चेंडू मारला, पण तो टिरीने अडविला.

दिल्लीला 20व्या मिनीटाला फळ मिळाले. नंदकुमारने पास मिळताच बॉक्समधील कालूच्या दिशेने अचूक क्रॉस पास दिला. कालूने चेंडूच्या स्थितीनुसार चपळाईने हालचाल करीत हेडींग केले. सुब्रतला डावीकडे झेप टाकूनही चेंडू अडविता आला नाही. यानंतर दोन मिनीटांत नंदकुमारने डावीकडून घोडदौड केली. त्याने कालूच्या दिशेने हात उंचावून खूण करीत चेंडू मारला. कालूने मग पहिल्या गोलची रिप्ले पूर्ण करीत अचूक हेडींग केले.

29व्या मिनीटाला जमशेदपूरला डावीकडे कॉर्नर मिळाला. जेरीने घेतलेल्या या कॉर्नरवर टिरीला संधी मिळाली आणि त्याने प्रितम कोटलपेक्षा सरस उडी घेत हेडींगवर गोल केला. 34व्या मिनीटाला जमशेदपूरचा गोल ऑफसाईड ठरविण्यात आला. इझू अझुकाचा फटका चुकूनही जेरीने संधी साधली. त्याने दिल्लीचा गोलरक्षक अर्णब दास शर्मा याला चकवित चेंडू नेटमध्ये मारला, पण तोच लाईनमनने झेंडा वर केला. रिप्लेमध्ये मात्र जेरी ऑफसाईड नसल्याचे दिसून आले.

35व्या मिनीटाला दिल्लीच्या विनीत रायने लालीयनझुला छांगटेकडे चेंडू मारला. छांगटेने छातीने चेंडू नियंत्रीत करीत आंद्रे बिकेला चकविले, पण त्याने मारलेला चेंडू क्रॉसबारवरून गेला. एक मिनीट बाकी असताना जेरीने 35 यार्ड अंतरावरून प्रयत्न केला, पण चेंडू थेट अर्णबकडे गेला. मध्यंतराला जमशेदपूर 1-2 असा पिछाडीवर होता.

दुसऱ्या सत्रातही वेगवान खेळ झाला. ­46व्या मिनीटाला फ्री-किकवर आंद्रे बिकेने मारलेला चेंडू टिरीने अशिम बिश्वासच्या दिशेने हेडींग केला. त्यावेळी विनीत रायच्या प्रतिकारामुळे बिश्वासचे हेडींग चुकले आणि चेंडू क्रॉसबारवरून गेला. जमशेदपूरने प्रयत्न सुरुच ठेवले. 54व्या मिनीटाला जेरीने कॉर्नरवर मारलेला चेंडू दिल्लीच्या खेळाडूला नीट अडविता आला नाही. त्यामुळे मिळालेली संधी सत्कारणी लावत राजूने अर्णबला चकवित गोल केला.

निकाल ।
जमशेदपूर एफसी : 3 (टिरी 29, युमनाम राजू 54, त्रिंदादे गोन्साल्वीस 86)
विजयी विरुद्ध दिल्ली डायनॅमोज : 2 (कालू उचे 20, 22)