ISL: गोव्यात दोन गोलसह पुणे सिटीचा विजय साजरा

फातोर्डा (गोवा): हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात धडाकेबाज फॉर्म गवसलेल्या एफसी गोवा संघाला शनिवारी रंगतदार लढतीत एफसी पुणे सिटीने 2-0 असे हरविले. दुसऱ्या सत्रात दोन गोल करीत पुण्याने बाजी मारली. गोव्याला घरच्या मैदानावर हरवित पुण्याने क्षमतेची चुणूक दाखविली.

 

नेहरू स्टेडियमवरील सामन्यात वेगवान आक्रमण करणाऱ्या गोव्याला पुण्याने त्याहून सरस प्रतिआक्रमणाच्या जोरावर चकित केले. उरुग्वेचा एमिलीयानो अल्फारो आणि ब्राझीलचा जोनाथन ल्युका यांनी गोल केले.

 

पुण्याने सात सामन्यांत चौथा विजय मिळविला. 12 गुणांसह हा संघ चौथ्या स्थानावर आला आहे. पुण्याने एक क्रमांक प्रगती केली. गोव्याचा सहा सामन्यांत दुसराच पराभव झाला. गोव्यानेही चार विजय मिळविले आहेत. गोवा 12 गुण तसेच सरस गोलफरकामुळे दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईयीन एफसी 13 गुणांसह आघाडीवर आहे. गोवा, बेंगळुरू एफसी व पुणे यांचे प्रत्येकी 12 गुण आहेत.

 

72व्या मिनिटाला मार्सेलो परेरा याने मध्य क्षेत्रातून प्रतिआक्रमण रचले. एमिलीयानो याने अचूक अंदाज घेत गोव्याच्या नेटच्या दिशेने धावण्यास सुरवात केली. त्यावेळी गोव्याचा महंमद अली त्याच्या पुढे होता.

 

यानंतरही एमिलीयानो याने जणू काही धावण्याची शर्यत असल्याप्रमाणे त्याला मागे टाकले. तोपर्यंत गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी पुढे सरसावला होता. परिणामी अलीने एमिलीयानो याला धक्का दिला, पण त्यापूर्वीच एमिलीयानो याने संयम कायम ठेवत शानदार किक लगावत चेंडू नेटमध्ये मारला.

 

आधीच्याच मिनिटाला पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याने काही सेकंदांच्या अंतराने झालेले  गोव्याचे तिहेरी हल्ले परतावून लावले होते. आधी त्याने फेरॅन कोरोमीनास याचा तिरकस पास थोपविला. मग ब्रँडन फर्नांडीसचा फटका त्याने अडविला.

 

अखेरीस मॅन्युएल अराना याचा प्रयत्नही त्याने फोल ठरविला. प्रत्येकवेळी मैदानावर पडल्यानंतर तो लगेच सावरला आणि पुढील हल्ला थोपविण्यासाठी सज्ज झाला. त्याची चपळाई संघाचे मनोधैर्य उंचावणारी ठरली. त्यानंतर पुण्याने लगेच खाते उघडले.

 

सहा मिनिटे बाकी असताना मंदारने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू अल्फारोच्या पायाला लागून उडाला. जोनाथनने मग चेंडू नेटमध्ये मारला. त्यावेळी कट्टीमनीला या हालचालींचा अचूक अंदाज घेता आला नाही. तो नेटपासून पुढे आला होता. 

 

त्याआधी पुर्वार्धात तिसऱ्या मिनिटाला पुण्याच्या दिएगो कार्लोसने मुसंडी डावीकडून मारली, पण त्याने गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्या अगदी जवळ चेंडू मारला. गोव्याने फार वेळ लावला नाही.

 

ब्रँडन फर्नांडीसने डावीकडून आगेकूच केली. बॉक्सच्या रेषेपराशी त्याने चेंडू हवेतून भिरभिरत मारला, पण पुण्याच्या सार्थक गोलुईने तो अडविला. लगेच आठव्या मिनिटाला मंदार रावदेसाई याने आगेकूच केली, पण पुण्याच्या लालछुआन्माविया याने त्याला रोखले.

 

19व्या मिनिटाला पुण्याच्या एमिलीयानो अल्फारो याने चांगली संधी दवडली. त्यामुळे डाव्या बाजूने मार्सेलो परेरा याने रचलेली चाल वाया गेली. 31व्या मिनिटाला दिएगो कार्लोसने सेरीटॉन फर्नांडीसला चकविले. त्याने ताकदवान किक मारली, पण कट्टीमनीने चेंडू अडविला.

 

त्याआधी 25व्या मिनिटाला अहमद जाहौहला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. त्याने मार्सेलो परेरा याला अवैधरित्या रोखले. पंचांनी कार्ड दाखविल्यानंतर अहमद काही शब्द बडबडला.

 

या सत्राच्या अंतिम टप्यात गोव्याच्या मॅन्युएल लँझारोटे याने काही चांगले प्रयत्न केले. 36व्या मिनिटाला त्याने डावीकडून पास दिला होता, पण फेरॅन कोरोमीनास आणि मंदार यांच्यापैकी कुणीच चेंडूपाशी पोचू शकले नाही. पुढच्याच मिनिटाला लँझारोटेला अहमदने पास दिला, पण पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याने अचूक बचाव केला.

 

43व्या मिनिटाला सार्थक गोलुईचा बॅकपास चुकला आणि कोरोमीनासला चेंडूवर ताबा मिळविता आला. तो चेंडू नेटच्या दिशेने मारण्यापूर्वीच गुरतेज सिंगने त्याला रोखले. त्यामुळे पुण्यावरील संभाव्य धोका टळला. पुर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती.