ISL 2017 : आज एफसी गोवा विरुद्ध बलाढ्य बंगळुरू एफसी संघात रंगणार सामना

फातोर्डा । आयएसएल स्पर्धेत आज एफसी गोवा विरुद्ध बंगळुरू एफसी संघात सामना रंगणार आहे. हा सामना गोवा संघाच्या घरच्या मैदानावर जवाहरलाल नेहरू स्टेडिअमवर रात्री ८ वाजता खेळवला जाणार आहे. या मोसमातील गोवा संघाचा हा घरच्या मैदानावरील पहिलाच सामना आहे.

या आधी एफसी गोवा संघाने त्यांच्या सलामीच्या लढतीत चेन्नईन एफसी संघावर २-३ अश्या फरकाने विजय मिळवत या वर्षीच्या मोसमाची सुरुवात विजयाने केली होती. परंतु त्यांना त्यांच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई सिटी एफसी विरुद्ध २-१ अश्या गोलच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा विजयी पथावर येण्यासाठी घरच्या मैदानावर एफसी गोवा प्रयत्न करेल.

त्याचबरोबर बंगळुरू एफसीसुद्धा आपला विजयी फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी याआधी झालेल्या मुंबईसिटी एफसी आणि दिल्ली डायनामोज संघांविरुद्ध अनुक्रमे २-० आणि ४-१ अश्या फरकाने विजय मिळवला आहे.

गोवा संघाचे प्रशिक्षक सर्गियो लोबेरा हे म्हणाले की बंगळुरू जरी चांगला संघ असला तरी आमचा संघ मनासारखा परिणाम साधण्यासाठी काहीही करेल. तर बंगळुरू संघाचे स्पॅनिश प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांनी स्पेनच्याच असणाऱ्या गोवा प्रशिक्षक सर्गियो लोबेरा यांचे कौतुक करून म्हणाले आमचा संघही गोवा संघाचा सामना करण्यास तयार असेल.