शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारताला शेवटच्या दिवशी तीन पदके

दक्षिण कोरियात सुरू असलेल्या शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये आज (14 सप्टेंबर) शेवटच्या दिवशी भारताला दोन सुवर्ण आणि एक रौप्य असे तीन पदके मिळाली आहेत.

गुरप्रीत सिंगने पुरुषांच्या वरिष्ठ गटात 25 मीटर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटकावले. तर भारतीय कुमार गटाने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली.

यामध्ये 16 वर्षीय विजयवीर सिधूने 25 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण आणि याच प्रकारात सिधूने सांघिक कामगिरी करत राजकंवर सिंग संधू आणि आदर्श सिंगसह अजून एक सुवर्णपदक पटकावले.

भारत या स्पर्धेत एकूण 27 पदकांसह पदतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये 11 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. तसेच भारताची ही आतापर्यंतची उत्तम कामगिरी ठरली आहे.

सांघिक फेरीत सिधूने 572 गुण मिळवत पहिले, संधूने (564) चौथे आणि सिंगने (559) दहावे स्थान मिळवले. यामुळे भारत एकूण 1695 गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. तर कोरियाला 1693 गुणांसह रौप्य आणि झेक रिपब्लिकला 1674 गुणांमुळे कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

गुरप्रीत सिंगने 579 गुण मिळवत रौप्य तर युक्रेनच्या पाव्लो कोरोस्टेलोव 581 गुणांनी सुवर्ण पदक पटकावले. कांस्य पदक विजेता कोरियाच्या किम जंगहोंगने सिंग एवढेच गुण मिळवले होते पण त्याला 10 सेंदक अधिक लागल्याने तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

तसेच या स्पर्धेत खेळताना भारताने 2020च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये दोन जागा निश्चित केल्या आहे. यात भारताच्या महिला नेमबाज अपूर्वी चंदेला आणि अंजुम मोदगील यांचा समावेश आहे.

या दोघींनी महिलांच्या 10 मीटर एयर रायफलमध्ये रौप्यपदक पटकावले आहे.

यांवर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) अंतिम निर्णय घेणार आहेत.
तसेच 6 ऑक्टोबरपासून युथ ऑलिंपिक गेम्स तर पुढील वर्षी फेब्रुवारीत दिल्ली येथे होणाऱ्या शुटींग स्पर्धाही 2020च्या ऑलिंपिकमध्ये पात्र होण्याच्या संधी असणार आहे.

 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टॉप १०: एशिया कप स्पर्धेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?