रिषभ पंतसाठी आयपीएलमधील हा आहे सर्वात खास क्षण, पहा व्हिडिओ

जयपूर। सोमवारी(22 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2019 चा 40 वा सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने नाबाद अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात 36 चेंडूत नाबाद 78 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच त्याने 42 धावांची उपयुक्तपूर्ण खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉ बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारीही केली. रिषभच्या या शानदार अर्धशतकी खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

हा सामना जिंकल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना पंतला दिल्लीचा सल्लागार सौरव गांगुलीने उचलून घेत शबासकी दिली. याक्षणी खूप विशेष वाटल्याचे पंतने सामन्यानंतर शॉबरोबर बोलताना सांगितले आहे.

पंत आणि शॉचा व्हिडिओ आयपीएलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात पंत शॉशी बोलताना म्हणाला, ‘मी सामना संपवून परत येत होतो. त्यावेळी सर्वजण माझ्यावर खूश होऊन कौतुकाचा वर्षाव करत होते. मला सौरव सरांनी जेव्हा उचलले तेव्हा खूप विशेष वाटले. हा खूप वेगळा अनुभव होता.’

पुढे पंत म्हणाला, ‘मोठे सामने संघासाठी जिंकून देण्याबद्दल आपण बोलतो आणि जेव्हा ते आपण करतो तेव्हा खूप छान वाटते.’

त्याचबरोबर पंतला त्याच्या खेळीबद्दल शॉने विचारल्यावर पंत म्हणाला, ‘माझ्यासाठी ते खूप मस्त होते. विशेष म्हणजे मी जेव्हा तूझ्याबरोबर(शॉ) फलंदाजी करत होतो. तेव्हा मला माहित होते आपण हा सामना जिंकू शकतो.’

या सामन्यानंतर सौरव गांगुलीनेही ट्विट करत पंतचे कौतुक केले आहे.

यानंतर पंतने शॉला जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर स्टंम्पला चेंडू लागूनही बेल्स न पडल्याने मिळालेल्या जीवदानाबद्दल विचारले, त्यावर शॉ म्हणाला, ‘माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता. मला कळाले नाही काय झाले. मला वाटले चेंडू माझ्या बॅटला लागुन गेला. पण जेव्हा कोणीतरी कदाचीत तूच(पंत) मला सांगितले की बेल्सवरील लाईट लागले होते.’

या सामन्यात राजस्थानकडून अजिंक्य रहाणेने नाबाद 105 धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे या दोघांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 6 बाद 191 धावा करत दिल्ली समोर 192 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून पंतबरोबरच सलामीवीर फलंदाज शिखर धवनने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे दिल्लीने 19.2 षटकात 192 धावांचे आव्हान 6 विकेट्स बाकी ठेवत सहज पूर्ण केले.

गोलंदाजीत राजस्थानकडून श्रेयस गोपालने 2, तर रियान पराग आणि धवल कुलकर्णीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तसेच दिल्लीकडून कागिसो रबाडाने 2 आणि इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि ख्रिस मॉरिसने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

सचिन आणि शारजामधील ती वादळी खेळी

पाकिस्तनचा नवा फंडा, विश्वचषकात पाकिस्तानसाठी नऊही सामने भारतासारखेच

आयपीएल २०१९: आजीचे निधन झाल्याने हा खेळाडू खेळणार नाही आजचा सामना