शतकवीर पृथ्वी शॉवर सोशल मिडियामधूनही कौतुकाचा वर्षाव!

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात पहिला कसोटी सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्य़ात 18 वर्षीय प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉने शतक झळकावले आहे.

त्याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तसेच कसोटी पदार्पणात शतक करणारा तो जगातील 106वा तर भारताचा 15 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

तो भारताकडून कमी वयात कसोटी शतक करणारा सचिननंतरचा दुसरा खेळाडू आहे. त्याने हे शतक 18 वर्ष 329 दिवसांचा असताना केले आहे तर सचिनने 17 वर्ष आणि 112 दिवसांचा असताना शतक केले होते.

शॉने 99 चेंडूत त्याचे हे पहिले आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले आहे. मात्र तो 134 धावांवर असताना देवेंद्र बिशूने स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत शॉला बाद केले. शॉने या डावात 154 चेंडूत 134 धावांची शानदार खेळी करताना 19 चौकार मारले.

तसेच शॉ हा दुलिप ट्राॅफी, रणजी ट्राॅफी आणि कसोटी पदार्पणात शतक करणारा भारतातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्यामुळे त्याचे सर्वांनीच कौतुकही केले आहे.

याबरोबरच या सामन्यात पहिल्या डावात सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शून्य धावेवर विकेट गमावल्यानंतर शॉने चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 206 धावांची द्विशतकी भागीदारीही केली आहे.

शॉच्या या दमदार कामगिरीमुळे सोशल मिडियामधून त्याच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. यात अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनीही ट्विट करत शॉचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-