दणदणीत विजयासह मुंबई अंतिम फेरीत, पुण्याशी होणार फायनल!

मुंबई इंडियन्सने चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर येथे कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यांत ६ विकेट आणि ३३ चेंडू राखत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. याबरोबर मुंबईने चौथ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली असून त्यांचा मुकाबला पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या पुणे सुपर जायंट्सशी होणार आहे.

प्रथम मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय किती योग्य होता हे मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्याच्या ९व्या चेंडूपासूनच सिद्ध करायला सुरुवात केली. बुमराहच्या दुसऱ्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर ख्रिस लीन पोलार्डकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर एकामागोमाग एक असे कोलकाताचे फलंदाज बाद होत गेले.
करण शर्माने ४ षटकात फक्त १६ धावा देत कोलकाताचे ४ बळी मिळविले. हरभजनच्या जागी त्याला संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करताना त्याने सुनील नारायण(१०), गौतम गंभीर(१२), ईशांक जोगी(२८) आणि कोलिन डे ग्रँडहोम (०) हे मोहरे टिपले.
स्पर्धेतील चौथाच सामना खेळत असणाऱ्या मिशेल जॉन्सनने त्याला उपयुक्त अशी साथ देताना पियुष चावला (२) आणि नॅथन कॉल्टर निल (६) यांना बाद केले.
मुंबईचा सर्वात जास्त भरवशाचा गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराहनेही जबदस्त कमाल दाखवत ३ षटकात फक्त ७ धावा देत ख्रिस लीन(४), रॉबिन उथप्पा(१) आणि सूर्यकांत यादव(३१) ह्या महत्वपूर्ण विकेट घेतल्या.
कोलकाता संघाचा डाव १८.५ षटकात १०७ धावांवर संपुष्टात आला.

मुंबईची सुरुवातही काही विशेष झाली नाही. पियुष चावलाने दुसऱ्याच षटकात सिमन्सला बाद करून मुंबईला पहिला धक्का दिला. पार्थिव पटेललाही विशेष काही करता आले नाही. उमेश यादवच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक उथप्पाकडे झेल देऊन तो १४ धावांवर बाद झाला. रायडूला या सामन्यातही चमक दाखवता आली नाही. त्याला पियुष चावलाने ६ धावांवर बोल्ड केले. यानंतर मुंबईला खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने कृणाल पंड्या आणि रोहित शर्मा यांनी नेले. त्यांनी ५४ धावांची भागीदारी केली. विजयासाठी २३ धावा बाकी असताना रोहित आऊट झाला. पोलार्ड आणि कृणाल यांनी १५व्या षटकात मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मुंबई विरुद्ध पुणे हा अंतिम फेरीचा सामना रविवार दिनांक २१ मे रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैद्राबाद येथे होणार आहे.