टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरीत क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे: एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरी गटात क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने स्टीव्ह दार्सिसचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 4-6,  6-3 असा पराभव  करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने बेलारूसच्या स्टीव्ह दार्सिस याचा 7-6(3), 4-6,  6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 1तास 55मिनिटे झालेल्या  संघर्षपूर्ण लढतीत पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला जोरदार खेळ केला व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला.

टायब्रेकमध्ये कार्लोविचने आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर 5-2अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर दार्सिसने 8व्या गेममध्ये केलेल्या डबल फॉल्टचा फायदा घेत कार्लोविचने त्याची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-6(7-3)असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दार्सिसने वरचढ खेळ करत हा सेट कार्लोविच विरुद्ध 6-4असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये 2-1अशा स्थितीत सामना असताना कार्लोविचने दार्सिसची सर्व्हिस ब्रेक केली व या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत हा सेट 6-3असा जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: उपांत्य फेरी:
इवो कार्लोविच(क्रोएशिया)वि.वि. स्टीव्ह दार्सिस(बेलारूस) 7-6(3), 4-6, 6-3