हा खेळाडू म्हणतो, विराटने आक्रमकता कमी करावी!

0 288

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याची आक्रमकता थोडी कमी करायला हवी असे मत मांडले आहे. कॅलिसच्या मते विराटची आक्रमकता त्याच्यासाठी फायदेशीर आहे पण संघासाठी ती असेलच असे नाही.

कॅलिस म्हणाला, “विराट आक्रमक आहे आणि माझ्या मते त्याच्या खेळासाठी ती आक्रमकता फायदेशीर आहे. पण त्याला याकडेही लक्ष द्यावे लागेल की ज्याप्रकारे त्याची आक्रमकता त्याच्यासाठी काम करते तशी संघासाठीही करते का? त्यामुळे त्याला थोडीफार आक्रमकता कमी करावी लागेल. त्याने त्याच्यातील उत्तम गोष्टी बाहेर येतील आणि मला वाटते त्याला त्याच्यासाठी खूप काही बदलण्याची गरज नाही. जेव्हा तो स्वतःमधेच आक्रमक असतो तेव्हा तो चांगली फलंदाजी करतो. “

पुढे कॅलिस म्हणाला, “विराट जसा आक्रमक आहे तसा एक कर्णधार म्हणून तुम्ही नेहमीच आक्रमक असू शकत नाही. त्यामुळे विराटला त्यावर काम करावे लागेल. तो अजूनही कर्णधार म्हणून तरुण आहे. माझी खात्री आहे जसे जसे त्याचे वय वाढेल तसे तसे तो शांत होईल. पण नक्कीच त्याची खेळासाठी असलेली जिद्द बघून छान वाटते.”

भारतीय संघाने नुकतेच विराटच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर विराट दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच या मालिकेत विराटने आत्तापर्यंत झालेल्या ५ सामन्यांमध्ये २ शतके तर १ अर्धशतक केले आहे.

विराटला यावर्षी आयसीसीने सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा आणि सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाजाचा पुरस्कार देऊन गौरविले होते.

Comments
Loading...
%d bloggers like this: