रवींद्र जडेजाचे खणखणीत द्विशतक

सौराष्ट्र विरुद्ध जम्मू काश्मीर संघांच्या रणजी सामन्यात काल भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने द्विशतकी खेळी केली. त्याच्या २०१ धावांच्या जोरावर सौराष्ट्राने ६२४ धावांवर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी डाव घोषित केला.

रवींद्र जडेजाने ३१३ चेंडूत २०१ धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने २३ चौकार आणि २ षटकार ठोकत जम्मू काश्मीर संघाच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. तो सामन्याच्या पहिल्या दिवशी १५० धावांवर नाबाद होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अखेर त्याचे द्विशतक पूर्ण झाल्यावर लगेचच त्याचा बळी घ्यायला वसीम रझाला यश मिळाले.

जडेजाला सामन्यात भक्कम साथ दिली ती शेल्डन जॅक्सनने. त्याने १८१ धावा केल्या. या दोघांची १८० धावांची भागीदारी झाली त्याच बरोबर स्नेल पटेलनंही ९४ धावा करत जडेजाची चांगली साथ दिली यांची १९९ धावांची भागीदारी झाली. या दोन मोठ्या भागिदाऱ्यांच्या जोरावर सौराष्ट्राने सामन्यावर पकड मिळवली आहे.

सौराष्ट्राने ७ बाद ६२४ धावांवर डाव घोषित केल्यावर जम्मू काश्मीर संघाने सुरवात काहीशी खराब केली त्यांनी दिवसाखेर ४ बाद १०३ धावा केल्या आहेत. ते अजून ५२१ धावांनी पिछाडीवर आहेत. त्यांच्याकडून या सामन्यात आत्तापर्यंत सलामीवर शुभम खजुरियाने सर्वाधिक ४१ धावा केल्या आहेत. तर जम्मू काश्मीर संघाचा कर्णधार परवेझ रसूल २१ धावांवर खेळत आहे.

जडेजा हा कसोटी क्रमवारीत गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जडेजाला भारतीय संघातून २२ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतून परवा त्याने नाबाद १५० धावा केल्यानंतरही वगळण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ४ थ्या आणि ५व्या वनडे सामने आणि टी २० मालिकेसाठीही निवड केली गेली नव्हती. त्याचमुळे त्याचे आत्ताचे द्विशतक म्हणजे तो फॉर्म मध्ये असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. त्याचबरोबर त्याने काल १ बळीही मिळवला आहे.