जयपूर लेगमध्ये होत आहे प्ले ऑफसाठी चुरस

प्रो कबड्डीचा सध्याचा मुक्काम जयपूरमध्ये आहे. या लेगमधील सामने प्ले-ऑफ मधील संघाचे स्थान निश्चित करण्यासाठी खूप उपयोगाचे ठरत आहेत. जयपूर लेग प्ले-ऑफच्या दृष्टीने खूप रोमहर्षक होत आहे. मागील काही सामन्यांतील पराभवांमुळे काही संघ प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत.

झोन ए मध्ये प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप चुरस होती. यु मुंबा, जयपूर पिंक पँथर्स, हरयाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण या चार संघात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याची चौरंगी लढत निर्माण झाली होती. त्यात यु मुंबा संघाला आपले उर्वरित सर्व सामने जिंकायचे होते. त्यावेळी यु मुंबाने हरयाणा स्टीलर्स संघाविरुद्ध हार पत्करली तर जयपूर विरुद्धच्या सामन्यात नांग्या टाकल्याने यु मुंबा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकणार नाही.

गुजरात फॉरचून जायन्टस संघ झोन ए मधून प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ बनला होता. हरयाणा स्टीलर्सने यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स यांचा पराभव करत ६९ गुणांसह प्ले-ऑफ मध्ये स्थान निश्चित केले आहे. हरयानाने २० सामन्यात ११ विजय मिळवले आहेत तर त्यांचे साखळी सामन्यातील आणखी दोन सामने बाकी आहेत.

झोन ए मध्ये पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स या दोन संघात प्ले-ऑफमध्ये जागा बनवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यात पुणेरी पलटणने १६ सामन्यात १२ विजय मिळवले असून त्याच्या नावावर ६३ गुण आहेत. पुणेरी संघाच्या साखळी फेरीतील आणखी ६ लढती बाकी आहेत. या सहा लढतीमध्ये पुणेरी संघाने एकही लढत जिंकली तर पुणेरी पलटण प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल. जयपूरसाठी समीकरण थोडे अवघड आहे. त्यांना त्यांच्या उर्वरित चारही लढती जिंकाव्या लागतील तर त्याच बरोबर पुणेरी पलटण संघाने सर्व सामने गमवले तरच ते प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करतील.

झोन बी मध्ये पटणा पायरेट्स आणि बेंगाल वॉरियर्स या संघाने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. झोन बीमध्ये प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत युपी योद्धा आणि बेंगलूरु बुल्सहे दोनच संघ आहेत. युपी संघाला प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित ३ सामन्यातील फक्त एक सामना जिंकायचा आहे. तर बेंगलूरु बुल्स संघाला त्यांचे उर्वरित चारही सामने जिंकायचे आहेत त्याच बरोबर युपी संघाने त्यांचे तीनही सामने गमावले तरच ते प्ले-ऑफमध्ये जागा बनवतील.

जयपूर लेग संपण्यास आणखी तीन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे या लेगमध्येच कोणते संघ प्ले ऑफमध्ये खेळतील ही निश्चित होणार आहे. म्हणून हा लेग या मोसमातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून पुढे येत आहे.

#प्ले ऑफमध्ये जागा मिळवलेले संघ

# झोन ए
१ गुजरात फॉरचून जायन्टस – २० सामने, १३ विजय , ७७ गुण
२ हरयाणा स्टीलर्स – २० सामने, ११ विजय, ६३ गुण

# झोन बी
१ बेंगाल वॉरियर्स -२० सामने, १० विजय,६९ गुण
२ पटणा पायरेट्स- २० सामने,१० विजय,६७ गुण