जयपूरचा पुणेरी पलटणला पराभवाचा धक्का !

काल प्रो कबड्डीमध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात जयपुर पिंक पँथर्स संघाने पुणेरी पलटण संघाचा पराभव केला. शेवटी अतिशय रोमहर्षक स्थितीत पोहचलेला सामना जयपूरने ३०-२८ असा जिंकला. या सामन्यात जयपुरचा कर्णधार मंजीत चिल्लरने चांगली कामगिरी केली तर त्याला जसवीर सिंगने साथ दिली. पुणेरी पलटणकडून संदीप नरवालने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत ९ गुण मिळवले पण तो पुणेरी पलटणला विजय मिळवून देऊ शकला नाही.

पहिल्या सत्राच्या सुरुवतीपासून दोन्ही संघांनी रेडींगमध्ये गुण मिळवण्यास सुरुवात केली. ८ व्या मिनिटाला सामना ६-६ अश्या बरोबरीत होता तर दोन्ही संघातील रेडर डु ऑर डाय रेडमध्ये बाद होत होते. १५ व्या मिनिटाला मनजीत चिल्लरच्या यशस्वी रेडमुळे सामना ९-९ अश्या स्थितीत पोहोचला. पहिले सत्र संपण्यास २ मिनिटे शिल्लक आसताना जयपुरने सामन्यात १३-९ अशी बढत मिळवाली. पहिले सत्र १४-११ अश्या स्थितीत संपले.

दुसऱ्या सत्रात पहिल्याच मिनिटात जयपुरची बढत ११-१७ अशी झाली. पुणेरी पलटणला ऑल आऊट करण्यात जयपुरला यश मिळाले. जयपुरचा कर्णधार मंजीत चिल्लरने सामन्यात उत्तम डिफेंसिव्ह खेळाचे प्रदर्शन करत ७ गुण मिळवले. या सामन्यात ३ गुण मिळवताच त्याच्या नावावर डिफेन्समध्ये २०० गुण मिळवण्याचा विक्रम झाला. या सामन्यात जयपुरने आपली बढत शेवटपर्यंत कायम राखत सामना जिंकला.

या सामन्यात पुणेरी पलटणच्या संदीप नरवालने उत्तम कामगिरी केली पण त्याला बाकी खेळाडूंकडून साथ लाभली नाही. या सामन्यात पुणेरी पलटणला पराभव सहन करावा लागला असला तरी ते झोन ए मध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. जयपुरचा या मोसमातील दोन सामन्यातला पहिला विजय आहे.