जयपूर विरुद्धचा इतिहास सुधारण्यासाठी पुणेरी पलटण उत्सुक

प्रो कबड्डीमध्ये आज जयपूरच्या सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियममध्ये घरेलू जयपूर पिंक पँथर्स संघ पुणेरी पलटण विरुद्ध भिडणार आहे. झोन ए मधील हे दोन्ही संघ अगोदर एकदा आपसात भिडले होते. त्या सामन्यात जयपूरने पुणेरी पलटण संघावर ३०-२८ अशी मात केली होती. प्ले ऑफमध्ये जागा बनवण्यासाठी जयपूर संघाला आपले उर्वरित सर्व सामने जिंकणे गरजेचे आहेत.

पुणेरी पलटण संघाने या मोसमात अनुभवी मंजीत ऐवजी दीपक निवास हुड्डा याला रिटेन करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मागील सामन्यात जरी जयपूरने पलटणला हरवले असले तरी या सामन्यात त्यांना जिंकणे खूप अवघड जाणार आहे. कालच्या सामन्यात जयपूरने यु मुंबाचा पराभव केला. या सामन्यात मंजीतने हाय फाइव्ह मिळवत विजयात मुख्य भूमिका बजावली या सामन्यात देखील त्याच्याकडून तशीच अपेक्षा असणार आहे.

रेडीगमध्ये या संघाला पवन कुमार, तुषार पाटील आणि नितीन रावल या खेळाडूंवर निर्भरीत राहावे लागणार आहे. मंजीत हा अष्टपैलू खेळाडू असला तरी तो सध्या जयपूरचा मुख्य डिफेंडर म्हणूनच जास्त खेळ करतो आहे. पुणेरी पलटण विरुद्धच्या सामन्यात प्रो कबड्डीचा इतिहास जयपूरच्या बाजूने आहे. त्यामुळे ते हा सामना जिंकून या संघाविरुद्ध पुन्हा विजय मिळवण्यास उत्सुक असतील.

पुणेरी पलटण हा संघ या स्पर्धेच्या मुख्य दावेदारांपैकी एक आहे. या संघाने सध्या स्पर्धेत सर्वात कमी १५ सामने खेळले असून त्यातील ११ सामने जिंकले आहेत. मागील सामन्यात त्यांना बेंगाल वॉरियर्स संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने या सामन्यात हा संघ पूर्ण ताकदीने उतरेल. मागील पाच सामन्यात या संघाने चार विजय मिळवले आहेत तर एक सामना गमावला आहे.

पुणेरी संघाची खरी ताकद त्यांचे डिफेंडर्स आहेत. संदीप नरवाल, धर्मराज चेरलाथन, गिरीष एर्नेक हे डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. हा संघ रेडींगमध्ये दीपक निवास हुड्डा आणि राजेश मंडल या खेळाडूंवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे राजेश मंडल आणि दीपक निवास हुड्डा यांना जबादारीने खेळ करावा लागणार आहे.

या सामन्यात विजयाची जास्त संधी पुणेरी पलटणला असणार आहे परंतु मागील सामन्यात चुका या संघाने टाळायला हव्यात. मंजीत चिल्लरसाठी योग्य रणनीती आखून त्याला शांत राखण्यात जर या संघाला यश आले तर हा संघ नक्की बाजी मारेल. जयपूरसाठी हा सामना देखील करो या मरो असाच असणार आहे.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-

# जयपूर पिंक पँथर्स आणि पुणेरी पलटण हे संघ प्रो कबड्डीमध्ये ९ वेळेस आमनेसामने आले आहेत त्यात जयपूरने ६ वेळा बाजी मारली आहे तर २वेळा पुणेरी पलटणने सामना जिंकला आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे.