ISL 2018: पहिल्या चार संघांत येण्यासाठी जमशेदपूरला एका विजयाची गरज

पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बुधवारी एफसी पुणे सिटी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात लढत होत आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर  जिंकल्यास जमशेदपूर चौथा क्रमांक गाठू शकेल.

जमशेदपूर 11 सामन्यांतून 16 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. लीगच्या चौथ्या मोसमात पुण्याने आक्रमक खेळात सातत्य राखले आहे. पुण्याला सुद्धा जिंकल्यास आघाडी घेण्याची संधी आहे. 11 सामन्यांतून पुण्याचे 19 गुण आहेत.

बेंगळुरू एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्यानंतर पुण्याचा तिसरा क्रमांक आहे. घरच्या मैदानावर जिंकल्यास पुणे या दोन्ही संघांना मागे टाकू शकेल. हा मुद्दा पुण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

आक्रमणात इतकी क्षमता असलेल्या संघासाठी मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविच पुन्हा मैदानाच्या बाजूला पुनरागमन करतील. त्यांच्यावरील चार सामन्यांच्या निलंबनाची कारवाई संपली आहे. सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळण्याची योग्यता पुण्याकडे असल्याचे पोपोविच यांना वाटते.

पुण्याला चेन्नई आणि बेंगळुरूविरुद्ध घरच्या मैदानावर पराभूत व्हावे लागले. त्यामुळे वाटचालीस खीळ बसला, पण दोन्ही सामन्यांत आपला संघ सरस असल्याबद्दल पोपोविच यांना शंका वाटत नाही.

संघाने घरच्या मैदानावर तीन पराभव पत्करल्याविषयी पत्रकार परिषदेत पोपोविच यांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, आम्ही पुण्यात काही चांगले सामने खेळलो आहोत. आपण केवळ निकालाचाच विचार केला तर तो मुद्दा वेगळा आहे.

आम्ही उत्तम व संघटीत खेळ केला. बेंगळुरूविरुद्ध आमच्या खेळाडूला लाल कार्ड मिळेपर्यंत आम्ही सरस होतो. बेंगळुरूला गोलसाठी प्रयत्न सुद्धा करता आला नव्हता. चेन्नईने पहिल्या सत्रात बॉक्सबाहेरून एक प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरल्यामुळे 1-0 असा विजय मिळविला.

जमशेदपूरचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी पुण्याचा संघ धोकादायक प्रतिस्पर्ध्यांत असल्याचे मान्य केले. त्यातही स्टार स्ट्रायकर मार्सेलिनीयो फॉर्मात आहे. गेल्या मोसमात गोल्डन बूट पुरस्कार जिंकलेल्या मार्सेलिनीयोने नऊ सामन्यांत सहा गोल आणि पाच गोलांमध्ये योगदान अशी कामगिरी आताच केली आहे.

कॉप्पेल यांनी सांगितले की, पुण्याकडे आघाडी फळीत काही भक्कम व चांगले खेळाडू आहेत. आम्हाला याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आम्हाला त्यांचा सामना करताना सर्वोत्तम खेळ करावा लागेल. त्याचवेळी त्यांना सुद्धा संघर्ष करण्यास भाग पाडावे लागेल.

गेल्या मोसमात कॉप्पेल यांच्या मार्गदर्शनाखील केरळा ब्लास्टर्सने अंतिम फेरी गाठली. एटीकेविरुद्ध त्यांना पेनल्टीवर पराभूत व्हावे लागले. आता पदार्पण करणाऱ्या जमशेदपूरला अद्याप पहिल्या चार संघांत स्थान मिळविता आलेले नाही, पण संघाच्या प्रगतीबद्दल त्यांना आनंद वाटतो.

जमशेदपूर आणि पुणे यांच्यात 11 सामन्यांनंतर केवळ तीनच गुणांचा फरक आहे. यासंदर्भात कॉप्पेल म्हणाले की, आम्ही पुणे सिटीच्या आसपास असल्याचा नक्कीच आनंद वाटतो. बाद फेरीतील प्रवेशाची शर्यत खडतर आहे, पण अनेक संघांना त्यासाठी संधी आहे आणि आमचा संघ यात समाविष्ट आहे. आमची स्थिती हेवा वाटण्यासारखी आहे.