जिगरबाज जमशेदपूरची बलाढ्य बेंगळुरूशी बरोबरी

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल)  श्री कांतिरवा स्टेडियमयवर झालेल्या बलाढ्य बेंगळुरू विरुद्ध जमशेदपूर एफसीने जिगरबाज खेळ करत  2-2 अशी बरोबरी साधली.

पहिले सत्र संपण्यास काही सेकंद बाकी असताना 20 वर्षीय निशू कूमारने बेंगळुरूचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 81व्या मिनिटाला जमशेदपूरच्या 16 वर्षीय गौरव मुखीने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. तसेच तो आयएसएलच्या इतिहासात गोल करणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला.

सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना कर्णधार सुनील छेत्रीने या मोसमातील पहिला गोल नोंदवित बेंगळुरूला आघाडी मिळवून दिली. मग अधिक वेळेतील चौथ्या मिनिटाला सर्जिओ सिदोंचा याने जशेदपूरच्या खात्यात एक गुण जमा केला. सामन्यातील चारही गोल प्रेक्षणीय ठरले.

या सामन्यात बेंगळुरूच्या तुलनेत जमशेदपूरचा संघ लवकर स्थिरावला. सुरवातीला चेंडूवर त्यांचे वर्चस्व जास्त होते. बेंगळुरूने स्थिरावल्यानंतर पहिला प्रयत्न 13व्या मिनिटाला नोंदविला.

यावेळी बेंगळुरूच्या मिकूने उजवीकडून उदांता सिंगला अप्रतिम पास दिला. त्याच्याकडून चेंडू मिळताच छेत्रीने फटका मारला, पण जमशेदपूरचा डिफेंडर टिरीने चेंडू धोकादायक क्षेत्रातून बाहेर घालविला.

तसेच दोन मिनिटांनी राहुल भेकेने सहकारी झिस्को हर्नांडेझ याला डावीकडे 25 यार्डावर पास दिला. स्पेनच्या हर्नांडेझने चेंडूवर ताबा मिळवित डाव्या पायाने फटका मारला, पण एक टप्पा पडून चेंडू शुभाशिष याच्याकडे गेला.

निशू कुमार हा या सामन्याचा हिरो ऑफ दी मॅच ठरला.

महत्त्वाच्या बातम्या-

कायलिन एमबाप्पेने ४५ वर्षांपुर्वीचा फुटबाॅलमधील विक्रम मोडला

टॉप 5: प्रो कबड्डीच्या पहिल्याच दिवशी झाले हे खास विक्रम