ISL 2017: डायनॅमोजला हरवून जमशेदपूरचा पहिलावहिला विजय

नवी दिल्ली:  हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पदार्पण करणाऱ्या जमशेदपूर एफसीने पहिल्यावहिल्या विजयाची प्रतिक्षा अखेर चौथ्या सामन्यात संपुष्टात आणली.

जमशेदपूरने येथील नेहरू स्टेडियमवर यजमान दिल्ली डायनॅमोजला एकमेव गोलने हरविले. स्पर्धेतील पहिल्यावहिल्या गोलसह पहिला विजय संपादन करीत जमशेदपूरने तीन गुण वसूल केले.

या कामगिरीसह जमशेदपूरचे सहा गुण झाले. त्यांनी गुणतक्त्यात पाचवे स्थान गाठले. पहिल्या पाचही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. दिल्ली तीन गुणांसह नवव्या स्थानावरआहे. घरच्या मैदानावरील निकाल दिल्लीसाठी धक्कादायक ठरला. दिल्लीने चेंडूवर तब्बल 71 टक्के वर्चस्व राखले होते, पण त्यांना अखेरपर्यंत अर्थपूर्ण चाल रचता आलीनाही.

पुर्वार्ध गोलशून्य बरोबरीत सुटला. त्यानंतर उत्तरार्धात पेनल्टी दवडल्यानंतर जमशेदपूरने काही मिनिटांत खाते उघडले. नायजेरियाच्या इझू अझुकाने 61व्या मिनिटाला हा बहुमोल गोल केला. हा जमशेदपूरचा स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला.

या लढतीपूर्वी दहा संघांमध्ये केवळ जमशेदपूरलाच गोलची प्रतिक्षा संपुष्टात आणता आली नव्हती. बाहेरील मैदानावर ही कामगिरी अझुकाने नोंदविली. हा गोल फ्री-कीकवर झाला. मेहताब होसेन याे फ्री-कीक घेत चेंडू पुरेशा उंचीने मारला. त्यावर अझुकाने अप्रतिम हेडींग केले. मेहताब पूर्वार्धात जायबंदी झाला होता.

त्याने गोल करता सर्वप्रथम आंद्रे बिके त्याचे अभिनंदन करण्यासाठी धावला. याचे कारण बिकेने आधी पेनल्टी किक दवडली होती. 57व्या मिनिटाला जमशेदपूरला ही पेनल्टी बहाल करण्यात आली. प्रतिक चौधरीने अझुका याला पाडले होते. त्यामुळे ही पेनल्टी बहाल करण्यात आली होती. ती घेण्यासाठी बिके पुढे सरसावला.

त्याने नेटच्या डाव्या कोपऱ्यात मैदानालगत चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण उजव्या पायाने मारलेल्या फटक्यात अचूकता, ताकद नव्हती. त्यामुळे दिल्लीचा गोलरक्षक अल्बीनो गोम्सने उजवीकडे झेप टाकत सहज चेंडू अडविला.

पुर्वार्धात काही क्षण महत्त्वाचे ठरले. 39व्या मिनिटाला दिल्लीचा विनीत राय आणि जमशेदपूरचा मेहताब होसेन यांच्यात चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी चुरस झाली.

त्यात मेहताबची धडक बसून विनीतच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. पंचांनी हे जवळून पाहिले. मेहताबचा धक्का चुकून लागल्यामुळे त्याला कोणतेही कार्ड देण्यात आले नाही.

सहाव्या मिनिटाला सामन्यातील पहिला कॉर्नर जमशेदपूरने मिळविला. उजव्या बाजूने मिळालेला कॉर्नर बिकाश जैरूने घेतला. त्यावर मेमोने हेडींग केले, पण चेंडू बाहेर गेला. 13व्या मिनीटाला दिल्लीचा गोल ऑफसाईड ठरविण्यात आला.

लालीयानझुला चांगटेला डाव्या बाजूला पाडण्यात आले. फ्री-कीकवर पॉलीनो डायसने चेंडूला दिशा दिली. त्यावर कालू उचेने प्रतिस्पर्धी बचावपटूंना हुलकावणी देत हेडींग केले. चेंडूला नेटला लागताच कालूने जल्लोष सुरु केला, पण क्षणार्धात ऑफसाईडचा ध्वज फडकला.