जनसेवा बँकेची जनता सहकारी बँकेवर मात

क्रीडा भारती व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार करंडक कबड्डी स्पर्धा

पुणे : क्रीडा भारती व सहकार भारती यांच्या वतीने आयोजित आंतरबँक सहकार करंडक कबड्डी स्पर्धेत जनसेवा बँक अ संघाने ठाण्याच्या जनता सहकारी बँक ब संघाचा २३ गुणांनी पराभव केला. शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. 
या स्पर्धेतील पहिल्या लढतीत जनसेवा बँक अ संघाने ठाणे जनता सहकारी बँक ब संघावर ३९-१६ अशी मात केली. पूर्वार्धात दोन्ही संघांकडून फारशा आक्रमक चाली रचल्या गेल्या नाहीत. पूर्वार्धाच्या अखेरच्या टप्प्यात जनसेवा बँक संघाने जनता बँक संघावर एक लोण चढविला. मध्यंतराला जनसेवा बँक संघाकडे १६-७ अशी आघाडी होती.
यानंतर उत्तरार्धात जनसेवा बँक संघाने आघाडी कमी होणार नाही. याची काळजी घेतली. जनसेवा बँक संघाने आणखी दोन लोण चढविले. जनसेवा बँक संघाकडून श्याम पवार (११ गुण), विजय पवार (८ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. जनता बँकेच्या काळूराम थोरातला (७ गुण) इतरांची फारशी साथ लाभली नाही.
यानंतर जनता सहकारी बँक अ संघालाही पराभव पत्करावा लागला. पुणे पीपल्स बँक आणि जनता बँक यांच्यातील लढत शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची झाली. यात पुणे पीपल्स बँक संघाने जनता बँक संघावर २७-२६ असा एका गुणाने विजय मिळवला. खरे तर जनता बँक संघाने आक्रमक सुरुवात केली होती. पूर्वार्धात जनता बँकेने पुणे पीपल्स बँकेवर लोण चढविला आणि मध्यंतराला १७-११ अशी आघाडी मिळवली. मात्र, उत्तरार्धात जनता बँक संघाला ही आघाडी टिकविता आली नाही.
दुसरीकडे, पुणे पीपल्स बँकेने आक्रमक चाली रचल्या आणि जनता बँकेवर एक लोण चढविला. याचा पुणे पीपल्स बँकेला फायदा झाला. निर्णायक क्षणी संयमी खेळ करून पुणे पीपल्स बँकेने जनता सहकारी बँकेला बरोबरीची संधी दिली नाही आणि ही लढत एका गुणाने जिंकली. पुणे पीपल्स बँकेकडून रोहित चव्हाणने (८) उत्कृष्ट खेळ केला. जनता बँकेच्या प्रकाश इंगवळेची (१०) लढत अपूर्ण ठरली.
यानंतर तिसऱ्या लढतीत संत सोपानकाका सहकारी बँक अ संघाने नगर अर्बन को. आॅपरेटीव्ह बँक संघावर ४०-१४ अशी सहज मात केली. 
यानंतर स्वप्नील भसमारेच्या (१०) अष्टपैलू खेळाच्या जोरावर विश्वेश्वर सहकारी बँक संघाने जनसेवा सहकारी बँक ब संघावर ३१-११ अशी मात केली. मध्यंतरालाच विश्वेश्वर बँक संघाने २४-३ अशी आघाडी घेऊन विजयाचा पाया रचला होता. इतर लढतींत पुणे अर्बन बँक संघाने पुणे म्युनिसिपल को. आॅपरेटीव्ह बँक संघावर ३२-१३ अशी मात केली.