१९ वर्षांखालील विश्वचषकातील १६ वर्ष जुना विक्रम या खेळाडूने मोडला

आज १९ वर्षांखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या जेसन रलस्टोनने पापुआ न्यू गिनी विरुद्ध गोलंदाजी करताना १६ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. त्याने फक्त १५ धावा देत ७ बळी घेतले आहेत. आजपर्यंतच्या १९ वर्षांखालील विश्वचषक इतिहासातील ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

याआधी श्रीलंकेच्या जीवन मेंडिसने झिम्बाब्वे विरुद्ध २००२ साली १९ धावात ७ बळी घेतले होते. पण अजूनही १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम भारताच्या इरफान पठाणच्या नावावर आहे. त्याने बांग्लादेशविरुद्ध २००३ मध्ये आशिया कपमध्ये १६ धावा देऊन ९ बळी घेतले होते.

१९ वर्षांखालील विश्वचषकात न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्टनेही २००८ साली २० धावा देऊन ७ बळी घेतले होते तर नेपाळच्या राहुल विश्वकर्माने २०१२ मध्ये पापुआ न्यू गिनीविरुद्धच ३ धावात ६ बळी घेतलेले होते.

आज ऑस्ट्रेलियाने पापुआ न्यू गिनी विरुद्ध ३११ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३७० धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून नॅथन मॅक्स्विनीने १५६ धावांची शतकी खेळी केली तर जेसन संघा आणि परम उपल यांनी अर्धशतकी खेळी केली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७१ धावांचा पाठलाग करताना पापुआ न्यू गिनीच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आले नाही. त्यांच्या फक्त एकाच फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली. लेक मोरेयाने २० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या जेसन बरोबरच रायन हॅडली आणि जॅक इव्हान्स यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.

दोन दिवसांपूर्वी भारतानेही पापुआ न्यू गिनी विरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवला होता.