२० धावांनी हुकले त्याचे वनडेतील द्विशतक

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयचे द्विशतक फक्त २० धावांनी हुकले आहे. त्याला मिशेल स्टार्कने १८० धावांवर बाद केले.

या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सने विजय मिळवून ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून ३०५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने ५ बळींच्या मोबदल्यातच पूर्ण केले.

जेसन रॉयने १५१ चेंडूंतच १८० धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने तब्बल १६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. जेसनने बाद झाल्यामुळे त्याचे वनडेत पहिले द्विशतक करण्याची संधी दवडली. त्याच्याबरोबरच इंग्लंडकडून जो रूटने नाबाद ९१ धावा फाटकावल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ आणि मार्क्यूस स्टोयनीसने १ बळी घेतला.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंचने ११९ चेंडूत १०७ धावा करत शतकी खेळी केली होती. तसेच मिशेल मार्श(५०) आणि मार्क्यूस स्टोयनीस(६०) यांनी देखील ऑस्ट्रेलियाकडून अर्धशतके झळकावली. या जोरावर ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३०४ धावा केल्या.

इंग्लंडकडून प्लंकेटने ३, आदिल रशिदने २, ख्रिस वॉक्स, मार्क वुड आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.