टी२०, वनडे पाठोपाठ जसप्रीत बुमराहचा कसोटीमध्येही ‘नो बॉल’

केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात आज कसोटी पदार्पण करणारा भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा नो बॉल टाकला आहे. त्याने टाकलेल्या या ‘नो बॉल’च्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा फाफ डुप्लेसिस बाद होण्याची संभावना होती.

सामन्याच्या ३० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डुप्लेसिस पायचीत बाद असल्याचे भारतीय संघाकडून अपील करण्यात आले होते, परंतु पंचांनी डुप्लेसिस बाद नसल्याचा निर्णय दिला. यावर भारतीय कर्णधार विराट कोहलीने दोन आवाज ऐकले असल्याचे सांगत यावर रिव्ह्यू घेतला.

मात्र या रिव्ह्यूमध्ये बुमराहनेच नो बॉल टाकला असल्याचे दिसून आल्याने पुढे डुप्लेसिस पायचीत बाद झाला होता की नाही हे बघण्याची वेळच आली नाही. पंचांनी हा चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय दिल्यानंतरही कोहलीला लक्षात आले नाही की डुप्लेसिस बाद झाला की नाही हे का तपासले गेले नाही त्यामुळे त्याने मी रिव्ह्यू घेतला होता हे सांगितले पण त्याला काही क्षणातच काय झाले हे कळाले.

यानंतर डुप्लेसिसने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने १०४ चेंडूत ६२ धावा केल्या. त्याला हार्दिक पंड्याने झेलबाद केले.

याआधीही बुमराहने बऱ्याचदा फलंदाजाला बाद केलेला चेंडू ‘नो बॉल’ टाकला आहे ज्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजाला जीवदान भेटले आहे.