तिसरा वनडे: जसप्रीत बुमराहचे वनडेत ५० बळी पूर्ण

कानपुर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या वनडे कारकिर्दीत ५० बळींचा टप्पा पार केला आहे. हा सामना त्याचा २८ वा सामना आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टील बुमराहचा ५० वा बळी ठरला.

सर्वात जलद वनडेत ५० बळी घेण्याच्या यादीत आता बुमराह २८ सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर या यादीत २३ सामन्यांसह अव्वल स्थानी आहे. 

बुमराहचा संघ सहकारी मोहम्मद शमी २९ सामन्यासह तिसऱ्या स्थानी आहे. इरफान पठाण (३१) आणि अमित मिश्रा (३२) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

सध्या भारताने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंड १५ षटकात १ बाद १०० धावांवर खेळत आहे. न्यूझीलंड कर्णधार केन विलिअमसन ३२ धावांवर तर सलामीवीर कोलिन मुनरो ५१ धावांवर खेळत आहे.