बुमराहला २०१९मध्ये सर्वच मालिकेत मिळणार नाही संधी, जाणून घ्या कारण

पुढीलवर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. या विश्वचषकासाठी आता केवळ पाच महिने उरले आहेत. त्यामुळे सर्वच संघ त्यादृष्टीने संघबांधणीची तयारी करत आहे. यात भारतीय संघाचीही तयारी सुरु झाली आहे.

त्यामुळेच खेळाडूंचा फिटनेस चांगला रहावा आणि ते ताजेतवाने रहावेत यासाठी भारतीय संघ प्रयत्न करत आहे. या कारणामुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अगामी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकांसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.

बुमराह हा भारतीय संघातील सध्याचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. तसेच विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार असल्याने त्याची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. त्याने या वर्षात चांगली कामगिरी केली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावर्षीचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

त्याने कसोटीमध्ये यावर्षी 9 सामन्यात 379.4 षटके गोलंदाजी केली आहे. तर मोहम्मद शमीने 12 सामन्यात 383.5 षटके गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर इशांत शर्माने 335 षटके आणि आर अश्विनने 386 षटके गोलंदाजी केली आहे.

पण अश्विन आणि इशांत यांचा विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या 20 जणांच्या संघात समावेश नसल्याने त्यांचा मोठा प्रश्न भारतासमोर नाही. ज्या 20 खेळाडूंचा विश्वचषकासाठी विचार केला जाणार आहे, त्यातील 16 जणांची निवड ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकांसाठी झाली आहे.

या 16 जणांच्या व्यतिरिक्त रिषभ पंत, श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि उमेश यादव यांचाही विश्वचषकासाठी विचार केला जाऊ शकतो.

तसेच बुमराह हा आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सचाही महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या फिटनेसचा विचार करता बीसीसीआय त्यांच्या फ्रँचायझींशीही बोलण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

किंग कोहलीकडून यंग चाहत्याला क्रिकेट पॅड भेट, पहा व्हीडिओ

२०१९मध्ये क्रिकेटच्या इतिहासात नोंद होणार हे तीन मोठे पराक्रम

रोहित शर्माच्या जागी या तिघांपैकी एकाला मिळणार संधी