कसोटी मालिकेतील शानदार प्रदर्शनानंतरही बुमराह खेळणार नाही वनडे मालिका

सि़डनी। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका सोमवारी (7 जानेवारी) 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. आता 12 जानेवारीपासून या दोन संघात 3 सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. तसेच त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या न्यूझीलंड दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी20 मालिका होणार आहे.

यातील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकांसाठी बीसीसीआयने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या ऐवजी मोहम्मद सिराजचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर सिद्धार्थ कौलचाही न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने 4 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत.

बुमराहला विश्रांती देण्याच्या निर्णयाबद्दल बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला त्याच्यावर येणारा ताण पाहता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी त्याला पुरक विश्रांती मिळेल.’

बुमराहने जानेवारी 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.  तो 2018 या वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाराही गोलंदाज आहे. त्याने 2018 मध्ये 30 सामन्यात 78 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

गुरुजी शास्त्रींचं पुन्हा धाडसी विधान, ऐकून व्हाल अवाक्

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम बनत आहे भारतात

७१ वर्ष, ३१ मालिका, ९८ सामने, २७२ खेळाडू, २९ कर्णधार…तरीही कोहली पहिलाच