सनथ जयसूर्या श्रीलंका संघावर नाराज

श्रीलंका विरुद्ध भारताचा ही कसोटी मालिका नुकतीच संपली. भारताने मालिका ३-० अशी खिशात घालत दोन कसोटी सामन्यात डावानी विजय मिळवला. ही बाब भारतासाठी अभिमानाची असली तरी श्रीलंकेसाठी नामुष्कीची आहे.

आपल्या घरच्या मैदानावर दुसरा संघ येऊन ३-० असा विजय मिळवणे ही अतिशय वेदनादायी आहे, असे मत श्रीलंकेचा निवड समिती अध्यक्ष सनथ जयसूर्याने व्यक्त केले आहे. सध्या खेळाडू निराश असून आम्हाला त्यांना बळ आणि आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. यापूर्वी भारताचे अनेक दौरे झाले आणि श्रीलंकेने त्यात चांगली कामगिरी केली आहे मात्र यावेळी चूक कुठे झाली हे तपासावे लागेल आणि त्यानुसार बदल करावे लागतील असे जयसूर्या म्हणाला.

सध्या श्रीलंका आंतर-प्रांतीय स्पर्धा घेण्यास उत्सुक आहे. या स्पर्धेमधून संघ आणि खेळाडू समोर येतात ज्यांना पुढे जाऊन मुख्य संघात संधी देता येऊ शकते. मात्र ही स्पर्धा व्यवस्थापन बदलले तरी चालू राहणे आवश्यक आहे, असेही जयसूर्याने स्पष्ट केले.

श्रीलंका सध्या अनेक मालिकेमध्ये व्यस्त असणार आहे. श्रीलंका आता नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे, ग्रॅहम फोर्ड यांनी राजीनामा दिल्यानंतर काही काळ निक पोथासने प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. मात्र आता पूर्णवेळ संघ प्रशिक्षक शोधण्यात व्यवस्थान व्याग्र् आहे