वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने रचला महिला क्रिकेटमध्ये हा मोठा इतिहास

भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आज वनडे कारकिर्दीत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. तिने वनडेमध्ये २०० विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा गाठणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

आज दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध भारतीय महिला संघाचा दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज लॉरा वोलवार्ड झुलनची २०० वी विकेट ठरली आहे. झुलनने तिच्या १६६ व्या वनडे सामन्यात हा २०० विकेट्सचा महत्वाचा टप्पा गाठला आहे.

विशेष म्हणजे भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनीही त्यांच्या १६६ व्या वनडे सामन्यात वनडेतील २०० विकेट्सचा टप्पा गाठला होता. तसेच कपिल देव हेही पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेणारे पहिले गोलंदाज ठरले होते.

झुलन याआधीच वनडेत सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली होती. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या वनडेतही ४ बळी घेण्याची महत्वाची कामगिरी केली होती. या पहिल्या वनडेत भारताने ८८ धावांनी विजय मिळवला होता.

आज भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर ५० षटकात ३०३ धावांचे आव्हान ठेवले आहे.