महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामीने केला नवीन विश्वविक्रम

आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम भारताच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना केला. तिने ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन फिट्झपॅट्रीकचा १८० बळींचा विक्रम मागे टाकत १५३ सामन्यांत १८१ बळी घेण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

 

३४ वर्षीय झूलनने आंतराराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २००२ साली चेन्नई येथे इंग्लंड विरुद्ध केली होती. १५ वर्षांच्या मोठ्या आंतराराष्ट्रीय कारकिर्दीत झूलन गोस्वामीने तब्बल १५३ सामने खेळताना हा विश्वविक्रम केला. आज आफ्रिकेविरुद्ध खेळताना ७.३ षटकात २० धावा देत तिने ३ बळी घेतले. ११व्या क्रमांकावर खेळायला आलेली रेसीबे नतॊझाखे ही तिचा विक्रमी १८१ बळी ठरली. कारकिर्दीत एका सामन्यात ५ बळी घेण्याचा विक्रम आजपर्यंत तिने दोन वेळा केला आहे त्यात ३१ धावांवर ६ ही तिची सर्वात चांगली कामगिरी राहिलेली आहे.

 

ऑस्ट्रेलियाच्या ४९ वर्षीय कॅथरीन फिट्झपॅट्रीकने हा विक्रम सन २००६ मध्ये केला आहे. त्यावेळी तिने न्यूजीलँड विरुद्ध २ बळी घेत ही कामगिरी केली होती. हा विक्रम तब्बल ११ वर्ष कॅथरीन फिट्झपॅट्रीकच्या नावावर होता.

 

भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या महिला क्रिकेटपटूच्या यादीत उत्तर प्रदेशची नीतू डेविड ही दुसऱ्या तर जागतिक यादीत ४थ्या स्थानी आहे.  नीतू डेविडने ९७ सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व करताना १४१ बळी घेतले होते तेही १६.३४ च्या सरासरीने.

 

झूलन गोस्वामीने भारताकडून खेळताना आजपर्यंत १० कसोटी, १५३ एकदिवसीय तर ६० आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळले आहेत. त्यात तिने एकूण २७१ बळी घेतले आहेत. तसेच २००७ साली तिला आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. २०१० साली भारत सरकारकडून तिला अर्जुन पुरस्कार तर २०१२ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या महिला क्रिकेटपटू

१८१ झूलन गोस्वामी ( १५३ सामने )
१८० कॅथरीन फिट्झपॅट्रीक ( १०९ सामने )
१४६ लिसा स्थळेकर (१२५ सामने )
१४१ नीतू डेविड (९७ सामने )
१३६ अनिसा मोहम्मद (१०१ सामने )