झुलन गोस्वामी दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेला मुकणार

भारतीय संघाची महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेला दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. तिला टाचेची दुखापत झाली आहे.

याबद्दल बीसीसीआय वूमेन्सच्या ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आलेली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेतून झुलन गोस्वामी बाहेर पडली आहे. तिला टाचेची दुखापत झाल्यामुळे सोमवारी एमआरआय स्कॅन करण्यात आले. तिला काही आठवड्यांची विश्रांती करण्यास सांगण्यात आले आहे.”

तसेच ती परत आल्यावर वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेईल. ती बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत दाखल होईल, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.

नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत गोस्वामीने वनडे कारकिर्दीत २०० विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. वनडेत २०० विकेट्स घेणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघ यांच्यातील टी २० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही ५ सामन्यांची टी २० मालिका होणार आहे. याआधी झालेली ३ सामन्यांची वनडे मालिका भारतीय महिलांनी २-१ ने जिंकली आहे.