हॅरी पॉटरच्या ५२ वर्षीय लेखिकेने टाकले ३२ वर्षीय रोनाल्डोला मागे

फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वाधीक मानधन कमवणाऱ्या युरोपियन प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत पोर्तुगालचा कर्णधार आणि रिअल माद्रिद संघाचा स्टार स्ट्रायकर क्रिस्तियानो रोनाल्डो हा दुसरा आहे. मागील काही वर्षांपासून CR७ ब्रँड मुळे त्याची कमाई खूप वाढली होती आणि तो या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. या वर्षी त्याला ब्रिटिश लेखिका जे.के रोलिंग यांनी मागे टाकले आहे.

हॅरी पॉटर सिरीजच्या लेखिका जे.के.रोलिंग यांची कमाई ९५ मिलियन यूएस डॉलर इतकी असून रोनाल्डो याची वार्षिक कमाई जवळजवळ ९३ मिलियन यूएस डॉलर इतकी आहे. रोनाल्डोसाठी चांगली बाब म्हणजे तो सध्याही जगातील सर्वाधिक वार्षीक उत्पन्न असलेला खेळाडू आहे. या यादीत बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स दुसऱ्या क्रमांकात आहे तर बार्सेलोनाचा लियोनल मेस्सी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

फोर्ब्सच्या मते ३२ वर्षीय रोनाल्डो जागतिक प्रसिद्ध श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे. या यादीत ड्रेक, रोलिंग,बियान्से आणि डिड्डी यांचा रोनाल्डोच्या अगोदर क्रमांक लागतो. या यादीत लियोनल मेस्सी १४व्या क्रमांकावर आहे.

फक्त युरोपियन यादीचा विचार केला तर रिअल माद्रिदचा गॅरेथ बेल आणि मँचेस्टर युनिटेडचा स्टायकार स्वीडनचा ज्लाटन इब्राहिमोविच हे अन्य फुटबॉलर या यादीत आहेत. ते अनुक्रमे १८ व्या आणि २० व्या स्थानावर आहेत.