जम्मू-काश्मिरच्या या गोलंदाजाची कमाल, घेतल्या ४ चेंडूत ४ विकेट्स

जयपूर। रणजी ट्रॉफी या भारतातील सर्वात महत्त्वाची मानली जाणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेच्या यावर्षीच्या मोसमाला 1 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी जम्मू काश्मिरच्या मोहम्मद मुदस्सरने 4 चेंडूत 4 विकेट घेण्याची मोठी कामगिरी केली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या पहिल्या डावात चेतन बिश्त आणि अशोक मेनरियाने चौथ्या विकेटसाठी 115 धावांची शतकी भागीदारी रचली होती. ही भागिदीरी मोहम्मदने 97 व्या षटकात अशोकला 59 धावांवर बाद करत तोडली.

मोहम्मदने त्याच्या पुढच्याच षटकात हॅट्रीकची कमाल केली. राजस्थानच्या पहिल्या डावातील 99 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर मोहम्मदने 159 धावांची शतकी खेळी करणाऱ्या चेतन बिश्तला पायचीत केले.

त्याच्या पुढच्याच सलग तीन चेंडूंवर त्याने तेजिंदर सिंग, राहुल चाहर आणि तन्वीर मशर्त उल हक या तिघांना बाद केले. या तिघांना भोपळीही फोडता आला नाही. विशेष म्हणजे मोहम्मदने या चारही विकेट फलंदाजांना पायचीत करुन मिळवल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार चेंडूत चार विकेट्स घेणारा तो दुसराच गोलंदाज ठरला आहे. याआधी अशी कामगिरी शंकर सैनी यांनी 25 नोव्हेंबर 1988 ला केली होती. त्यांनी दिल्लीकडून खेळताना हिमाचल प्रदेश विरुद्ध ही कामगिरी केली होती.

मोहम्मदने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाचव्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच त्याने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही छत्तीसगढ़ विरुद्धही हॅट्रीक घेण्याची कामगिरी केली होती.

मोहम्महदने घेतलेल्या पहिल्या डावातील एकूण पाच विकेट्समुळे राजस्थानची आवस्था 3 बाद 329 धावांवरुन 8 बाद 330 धावा अशी झाली. मात्र त्यानंतर राजेश बिश्नोइ आणि अनिकेत चौधरीने 9 व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचत राजस्थानला पहिल्या डावात 379 धावांचा टप्पा गाठून दिला.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनीबरोबरच टी२० खेळत नसलेला खेळाडू म्हणतोय, धोनी संघाचा अविभाज्य भाग आहे

विराटचं ठीक आहे, बाकी खेळाडूंची आयसीसी क्रमवारी नक्की पहा

धोनीवर टीका करण्याआधी धोनीची २०१८मधील कामगिरी नक्की पहा