विश्वचषक २०१९: १६ वर्षांपूर्वीचा पाँटिंगचा विक्रम मोडत जो रुटने रचला इतिहास

बर्मिंगहॅम। गुरुवारी(11 जूलै) 2019 क्रिकेट विश्वचषकात एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 8 विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

या विजयाबरोबरच इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रुटने खास विश्वविक्रम केला आहे. त्याने या सामन्यात नाबाद 49 धावा करण्याबरोबरच क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी करताना पॅट कमिन्सचा झेलही घेतला. त्यामुळे रुटचे या विश्वचषकात एकूण 12 झेल झाले आहेत.

यामुळे तो एका विश्वचषकात क्षेत्ररक्षक म्हणून(यष्टीरक्षक व्यतिरिक्त) सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा महान माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या 2003 विश्वचषकातील 11 झेलच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

या यादीत रुट आणि पाँटिंगच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आहे. त्याने 2019 च्याच विश्वचषकात 10 झेल घेतले आहेत. तसेच इंग्लंडच्याच जॉनी बेअरस्टोने याच विश्वचषकात 9 झेल घेतले आहेत. तो या यादीत रिली रोसोऊच्या बरोबरीने चौथ्या स्थानावर आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 223 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक 85 धावांची खेळी केली होती. तर ऍलेक्स कॅरेने 46 धावांची छोटेखानी चांगली खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि आदिल राशिदने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने 124 धावांची सलामी भागीदारी रचली. बेअरस्टो 34 धावा केल्या. तर रॉयने 65 चेंडूत 85 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.

हे दोघे बाद झाल्यानंतर इयान मॉर्गनने नाबाद 45 आणि जो रुटने नाबाद 49 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

एका विश्वचषकात क्षेत्ररक्षक म्हणून(यष्टीरक्षक व्यतिरिक्त) सर्वाधिक झेल घेणारे क्रिकेटपटू – 

12 झेल – जो रुट (2019)

11 झेल – रिकी पाँटिंग (2003)

10 झेल – फाफ डुप्लेसिस (2019)

9 झेल – रिली रोसोऊ (2015)

9 झेल – जॉनी बेअरस्टो (2019)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

तब्बल ३२७ महिन्यांनतर इंग्लंडच्या संघाने केला असा मोठा पराक्रम

इंग्लंडला फायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचललेल्या रॉयला झाली ही मोठी शिक्षा

खेळाडूंचा फिटनेस सांभाळणाऱ्या पॅट्रिक फऱ्हाट यांचा टीम इंडियाला अलविदा