इंग्लंडच्या जॉनी बेस्ट्रोला मिळाली आत्महत्या केलेल्या आपल्या वडिलांची एक खास आठवण

ऍडलेड ओव्हल स्टेडिअमवर सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्या दरम्यान इंग्लंड यष्टीरक्षक जॉनी बेस्ट्रोला एका चाहत्यांकडून त्याच्या वडिलांची एक खास भेट मिळाली आहे. या भेटीमुळे बेस्ट्रो भावुक झाला होता.

एंड्रयू जॉन्स या चाहत्याने बेस्ट्रोला त्याच्या दिवंगत पिता डेव्हिड बेस्ट्रो यांचे ३९ वर्षे जुने ग्लोव्ज भेट म्हणून दिले. ही भेट काल सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी जोन्सने बेस्ट्रोला दिली. त्यावेळेस बेस्ट्रो म्हणाला “ही खूप छान भेट आहे.”

जॉनी बेस्ट्रोचे वडील डेव्हिड बेस्ट्रो हे इंग्लंडचे माजी कसोटी यष्टीरक्षक होते, त्यांनी जॉनी ८ वर्षांचा असतानाच आत्महत्या केली होती. ते इंग्लंड संघाकडून ४ कसोटी सामने आणि २१ वनडे सामने खेळले होते.

या ग्लोव्जबद्दल चाहता जोन्सने एबीसी रेडियोशी बोलताना सांगितले ” मी या ग्लोव्जला ३९ वर्षे सांभाळून ठेवले होते. मला एकदा माझे आई- वडिल ऍडलेडमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये घेऊन गेले होते तेव्हा तिथे इंग्लंडचा संघही भेट देण्यासाठी आला होता.”

“तिथे त्यांनी छोटी प्रश्नमंजुषा खेळली त्यावेळी त्यांनी एक प्रश्न विचारला की इंग्लंडचे रिझर्व्ह यष्टिरक्षक कोण होते त्यावेळी मी हात वर करून डेव्हिड बेस्ट्रो असे उत्तर दिले होते. तेव्हा त्यांनी स्वाक्षरी करून या ग्लोव्जची जोडी भेट दिली.”

“मी त्या ग्लोव्जच्या जोडीला ३९ वर्षे एका बॉक्समध्ये सांभाळून ठेवले होते.”

त्याचबरोबर जोन्सने सांगितले की त्याने इंस्टाग्रामवरून जॉनी बेस्ट्रोशी संपर्क साधला. त्यावेळी सकाळी जेव्हा जोन्स ग्लोव्ज घेऊन मैदानाजवळ पोहोचल्याचे सांगताच बेस्ट्रो २ मिनिटात तिथे येऊन त्याला भेटला. जोन्सने हेही सांगितले की बेस्ट्रो हे ग्लोव्ज पाहून भावुक झाला होता. यानंतर त्यांनी जवळ जवळ ४५ मिनिटे गप्पा मारल्या.

जोन्सच्या वडिलांचे याच वर्षी जूनमध्ये निधन झाले त्यामुळे तो म्हणाला कि जर त्याला त्याच्या वडिलांची कोणती गोष्ट भेट म्हणून दिली तर त्याला ती हवी असेल आणि म्हणूनच जोन्सला ही ग्लोव्जची भेट बेस्ट्रोला द्यायची होती.

बेस्ट्रोने या भेटीबद्दल सांगितले की ” हे माझ्यासाठी खूप विशेष आहे. मी खरंच भाग्यवान आहे की मी कुठेही गेलो तरी मला माझ्या वडिलांबद्दलच्या अनेक आठवणी लोक सांगतात.”