फेडशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुली उपांत्य फेरीत गारद

तामिळनाडू दोन्ही गटात अंतिम फेरीत

उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने सुरू असलेल्या ” ५व्या कुमार/कुमारी गट फेडशन कप कबड्डी स्पर्धेत तामिळनाडू , हरियाना यांनी मुलींच्या , तर तामिळनाडू, दिल्ली यांनी मुलांच्या गटात अंतिम फेरी गाठली.

नॉर्दन फिल्ड कोल्ड ली. च्या काकरी, जिल्हा सोनभद्र येथील एकलव्य क्रीडांगणावर झालेल्या मुलींच्या उपांत्य सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राचे आव्हान २४-२१असे संपविले.

मध्यांतराला १४-१३अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरार्धात तो जोश राखता आला नाही. शेवटच्या काही मिनिटापर्यंत सामना महाराष्ट्राच्या बाजूने झुकलेला होता.

पण संयम आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे महाराष्ट्राला सामना गमवावा लागला. आसावरी कोचरने १०गुण घेत शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली. तिला अंकिता चव्हाण, तसमीन बुरोंडकर यांनी ३-३पकडी करीत छान साथ दिली.

पण मानसी रोडेचे अपयश महाराष्ट्राला पराभवाच्या खाईत घेऊन गेले. तिने ३गुण मिळविले खरे, पण ४वेळा तिची पकड झाली. मुलींच्या दुसऱ्या सामन्यात तामिळनाडूने साईला २५-२४असे चकवित अंतिम फेरी गाठली.

मुलांमध्ये तामिळनाडूने केरळला, तर दिल्लीने उत्तर प्रदेशाला नमवित अंतिम फेरीत धडक दिली.