फेडशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुली उपांत्य फेरीत, मुले साखळीतच गारद

महाराष्ट्राच्या मुलींनी ५व्या कुमार / कुमारी गट फेडशन कप कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मुलांचा संघ मात्र साखळीतच गारद झाला.

उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने आणि नॉर्दन कोल्ड फिल्डच्या सहकार्याने काकरी जिल्हा सोनभद्र येथील एकलव्य क्रीडांगणावर सुरू असलेल्या मुलींच्या अ गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशचा ४०-२४ असा पराभव करीत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्र्चित केले.

या अगोदर झालेल्या सामन्यात साईने महाराष्ट्राचा ३२- २० असा पराभव केला होता. त्यामुळे महाराष्ट्राला ही लढत ” मरा किंवा मारा” अशीच होती. त्यामुळे त्यांनी या सामन्यात आक्रमक खेळावर भर देत मध्यांतराला २४-१४ अशी भक्कम आघाडी घेतली.

नंतर तोच जोश कायम राखत १६गुणांनी सामना खिशात टाकला. मानसी रोडे, आसावरी कोचर यांच्या चढाया तर काजल सावंत , अंजली मुळे यांचा भक्कम बचाव या विजयात महत्वाचा ठरला.

मोक्याच्या क्षणी अंजली सावंत हिने केलेल्या ३अव्वल पंकडीचे मोल देखील महत्वाचे होत. या गटातील चौथा संघ मध्य प्रदेश गैरहजर राहिल्यामुळे आपण थेट उपांत्य फेरी गाठली. हरियाणा संघाशी महाराष्ट्राची उपांत्य लढत होईल.

पहिल्या साखळी सामन्यात आघाडी घेऊन बरोबरीवर समाधान मानावे लागलेल्या महाराष्ट्राच्या मुलांना आज दोन्ही सामन्या पराभवाचा सामना करावा लागला. केरळने महाराष्ट्राला ३४-२६ असे,तर उत्तर प्रदेशने त्यांना ३४-२१ असे पराभूत करीत साखळीतच आव्हान संपुष्टात आणले.

पहिल्या सामन्यातील जोश महाराष्ट्राला नंतर दाखविता आला नाही. सतपाल कुमावत जायबंदी झाल्याचा फटका देखील महाराष्ट्राला बसला. सौरभ पाटील, शुभम शिंदे यांना प्रतिकार केला खरा परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यास कमी होता.