कुमार गट कबड्डी स्पर्धेत दुर्गामाताने पटकावला “श्रमसाफल्य चषक”.

परळच्या दुर्गामाता स्पोर्ट्सने जयदत्त क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. दुर्गामाताचा प्रथमेश पालांडे ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू. त्याला कुलर देऊन गौरविण्यात आले.

मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने प्रभादेवी, राजाराम साळवी उद्यानातील स्व. निलेश सहदेव राऊत क्रीडांगणावर खेळविण्यात आलेल्या कुमारांच्या अंतिम सामन्यात दुर्गामाताने दादरच्या जय दत्तगुरुचा प्रतिकार ३७- २८असा मोडून काढत ” श्रमसाफल्य चषक” व रोख रु. अकरा हजार संघाच्या खात्यात जमा केले.

उपविजेत्या जय दत्तगुरुला रोख रु. सात हजार व चषकावर समाधान मानावे लागले. दुर्गामाताच्या प्रथमेश पालांडे, करणं कदम यांनी सावध व संयमी खेळ करीत पहिल्या डावात १४-११अशी आघाडी घेतली.

उत्तरार्धात बचावावर अधिक भर देत ९गुणांनी सामना खिशात टाकला. जय दत्तगुरूंच्या सिद्धांत बोरकर, मोनू कांदू, आकाश उपाध्याय यांना अंतिम सामन्यात सूर सापडला नाही.

या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात दुर्गामाताने गोलफादेवीचा ४२-४१असा निसटता पराभव केला. खऱ्या अर्थाने हाच सामना डोळ्यांचे पारणे फेडणारा झाला. अंतिम सामन्याची झलक या सामन्यात पहावयास मिळाली.

शेवटच्या मिनिटापर्यंत सामना गोलफादेवीच्या बाजूने झुकलेला होता. पण शेवटच्या क्षणी दुर्गामाताने बाजी पलटविली.दुसऱ्या चुरशीच्या सामन्यात जय दत्तगुरुने अमरहिंदचे आव्हान ३४-३०असे संपुष्टात आले.

उपांत्य पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. दोन हजार प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू म्हणून अनुक्रमे जय दत्तगुरूंच्या सिद्धांत बोरकर आणि आकाश उपाध्याय यांना प्रत्येकी ओवन देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून विजय बजरंग संघाला चषक व रोख रु.एक हजार देऊन गौरविण्यात आले. एस एस जी फौंडेशनचा पंकज मोहिते हा स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू ठरला. त्याला देखील ओवन देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश सावंत, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय वडार, संजय सरदेसाई, तारक राऊळ यांच्या उपस्थितीत पार पडला.