कुमार राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची निवड चाचणी सेलू परभणी येथे सुरु

परभणी जिल्हा कबड्डी असो. व ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था, जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” ४५व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत” कोल्हापूर विरुद्ध ठाणे, पुणे विरुद्ध पालघर अशा कुमार, तर मुंबई शहर विरुद्ध रत्नागिरी, सातारा विरुद्ध कोल्हापूर अशा कुमारी गटात उपांत्य लढती रंगतील. मुलांमध्ये गतवर्षी खेळलेल्या पाहिल्या चार संघांपैकी फक्त कोल्हापूर या संघाने सातत्य राखले आहे. तर मुलींमध्ये पुणे हा गतविजेता यंदा प्रथमच पहिल्या चार संघात नाही.

परभणी-सेलू येथील कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी क्रीडानगरीत सुरू असलेल्या मुलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पालघरने यजमान परभणीचे आव्हान ३७-२५असे संपविले. घरच्या रसिकांच्या पाठिंब्यावर परभणीच्या नितीन जाधव, ज्ञानेश्वर डुकरे यांनी पूर्वार्धात चतुरस्त्र खेळ करीत संघाला १२-११अशी नाममात्र आघाडी घेऊन दिली होती. पण उत्तरार्धात ती त्यांना टिकविता आली नाही. उत्तरार्धात पालघरच्या राहुल सवर, अविनाश पालये, ओंकार साळुंखे यांनी टॉप गियर टाकत भराभर गुण घेत परभणीवर  दोन लोण चढविले. येथेच सामना यजमानांच्या हातून निसटला. दुसऱ्या सामन्यात पुण्याने मुंबई शहरला ४२-१९ असे पराभूत करीत धडाक्यात उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावातच दोन लोण चढवित पुण्याने २३-१०अशी आघाडी घेत मुंबईच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली. दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईला एकही लोण फेडता आला नाही. बाळकृष्ण करांडे, सुनील चौधरी यांच्या चौफेर खेळाला पुण्याच्या विजयाचे श्रेय जाते. मुंबईच्या सुशांत पाडावे, गणेश तुपे, यांची मात्रा आज चालली नाही.

ठाण्याने मुंबई उपनगरला ३०-२०असे नमवित उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला १०-११अशा पिछाडीवर पडलेल्या ठाण्याने उत्तरार्धात मात्र आपला खेळ उंचावला. त्यांच्या परेश हांडे, शक्तीसिंग यादव यांनी धुव्वादार खेळ करीत उपनगरवर दोन लोण चढवित हा विजय साकारला. उपनगरच्या सुनील मल्लाह, सिद्धेश पांचाळ यांचा उत्तरार्धात प्रभाव पडला नाही. शेवटच्या सामन्यात कोल्हापुरने जळगाववर ४४-१९ अशी मात केली. पूर्वार्धातच दोन लोण देत त्यांनी २५-१०अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. उत्तरार्धात आणखी एक लोण देत त्यावर कळस चढविला. सौरभ पाटील, साईनाथ कोंडुस्कर यांच्या नेत्रदीपक खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जळगावकडून गणेश शाहू, प्रवीण बिऱ्हप बरे खेळले.

मुलींच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई शहराने बलाढ्य अशा पुण्याचे आव्हान २६-२२ असे संपुष्टात आले. मध्यांतराला दोन्ही संघ १०-१० अशा समान गुणांवर होते. उत्तरार्धात मुंबईने पुण्यावर लोण देत आघाडी घेतली व ती आघाडी आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजीही घेत हा विजय साकारला. पुण्याने तीन अव्वल पकडी करीत हा लोण काही काळ लांबविला. पण अखेर लोण शेवटच्या क्षणी झाल्यामुळे त्यांना विजयासाठी प्रयत्न करण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही. ऋणाली भुवड हिचा अष्टपैलू खेळ आणि त्याला मिळालेली प्रतीक्षा तांडेलची चढईची साथ त्यामुळे मुंबईने हा विजय साकारला. पुण्याची ऐश्वर्या शिंदे एकाकी झुंजली. रत्नागिरीने सिंधुदुर्गला ३५- २१ असे सहज नमविलें. तसमीन बुरोंडकर, गौरी पवार, सोनाली जमेल रत्नागिरीकडून, तर निकिता राऊत, रुपाली सावंत, कोमल राऊत सिंधुदुर्गकडून उत्कृष्ट खेळल्या. कोल्हापूरने अहमदनगरला ४६-३०असे नमवित आगेकूच केली. प्रियांका पाटील, स्नेहा शिंदे कोल्हापूरच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. स्नेहल खंडागळे, जया राऊत अहमदनगरकडून बऱ्या खेळल्या. शेवटच्या सामन्यात साताऱ्याने मुंबई उपनगरचा प्रतिकार ३४-२९असा मोडून काढत उपांत्य फेरीत आपली जागा निश्र्चित केली. सोनाली हेळवी, शुभदा खोत यांनी सुरुवाती पासून आपल्या खेळाला आक्रमते बरोबरच सावध खेळाची जोड देत विश्रांतीला १८-१४अशी आघाडी घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत ती टिकवून धरत हा विजय साकारला. उपनगरच्या प्रणाली नागदेवते, काजल खैरे यांनी शेवट पर्यंत संघाच्या विजयासाठी शर्थीची लढत दिली. पण अखेर ती निष्फळ ठरली.