मुंबईत १९ वा कबड्डी दिन सोहळा संपन्न

“बँका, सरकारी-निमसरकारी आस्थापने,तेल व विमा कंपन्यात खेळाडू भरतीकरिता माझ्या सर्व सहकाऱ्याना सोबत घेऊन जोमाने प्रयत्न करेन” असे आवेशपूर्ण उदगार खासदार व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी(15 जूलै) कबड्डी दिनाच्या कार्यक्रमाच्या निमिताने बोलताना काढले.

मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या विद्यमाने रंगशारदा सभागृह, बांद्रे (प.), मुंबई येथे महाराष्ट्र कबड्डी दिनाच्या निमिताने ते बोलत होते. क्रीडा क्षेत्रात कबड्डी हा खेळ क्रीडारसिकाना आकर्षित करीत आहे. पण राज्य आणि देशाचे क्रीडा खाते याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे बँका आणि इतर कॉर्परेट जगत या खेळाला आर्थिक मदत देण्यास नाखूष असतात. देशाच्या आणि राज्याच्या क्रीडा खात्याच्या आर्थिक धोरणाची मदत घेऊन ते राबविण्याकरिता आणि या आस्थापनामध्ये कबड्डीचा संघ स्थापन करून खेळाडूना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करेन असे पुढे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला प्रकृती अस्वस्थामुळे राज्य कबड्डी असो.चे विद्यमान अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांनी आपले मनोगत पाठविले होते ते त्यांचे स्वीय सचिव सोलवट यांनी वाचून दाखविले. त्यात त्यांनी खासदार म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले. यात त्यांनी कबड्डीच्या खेळाच्या, खेळाडूंच्या आणि कार्यकर्त्यांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख केला. तसेच देशात सुरू असलेल्या कबड्डीचा गोंधळाचा उल्लेख करून देश पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे आशेने पहात आहे.असे म्हणून पुढील संकेत दिले. राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघ साखळीतच गारद झाला याचे दुःख व्यक्त करून याची चौकशी संघटनेचे उपाध्यक्ष देवराम भोईर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिस्तपालन समिती मार्फत करण्यात येईल असे जाहीर केले.

कबड्डी दिनानिमित्त यंदाच्या वर्षातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून ” स्व.मधुसूदन पाटील” पुरस्कार जाहीर झालेला अजिंक्य पवार हा प्रो-कबड्डीच्या सरावात गुंतल्यामुळे पारितोषिक घेण्याकरिता आला नाही. या निमित्ताने सुरेश पावसकर, कृष्णा तोडणकर, लक्ष्मणराव सारोळे यांनी जेष्ठकार्यकर्ते म्हणून, बाळकृष्ण विचारे,अनंत शिंदे,लक्ष्मण मोहिते, शिवाजी खांडरे, लक्ष्मण जाधव यांनी जेष्ठपंच म्हणून, निवृत्ती बांगर, शुभांगी दाते-जोगळेकर यांनी जेष्ठ खेळाडू म्हणून, मितेश पाटील, आम्रपाली गलांडे (आम्रपाली ही उपस्थित नव्हती) यांनी यंदाचे राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उत्तम खेळले म्हणून, जयंत कुलकर्णी, समीर सावंत यांनी क्रीडा पत्रकार म्हणून, बाबाजी दुर्रराणी, पांडुरंग पार्टे यांनी कृतज्ञता पुरस्कार, नाशिक जिल्हा कबड्डी असो. उत्कृष्ट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आयोजनाबद्दल, राज्याअजिंक्यपद स्पर्धेत गुणानुक्रमे पहिला जिल्हा म्हणून पुण्याने ,तर ज्ञानदेव मुळे यांनी “श्रमजीवी क्रीडा कार्यकर्ता” म्हणून पाहुण्यांकडून पुरस्कार स्विकारले. महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी ज्या खेळाडू, कार्यकर्ता, प्रशिक्षक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव केला त्यांचाही या ठिकाणी अमृत कलश, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला कबड्डी रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यांचे ” मराठी पाऊल पडते पुढे” या वाद्यवृंदाने चांगलेच मनोरंजन केले.