कबड्डीपटू किशोरी शिंदेने दिले अदिवासी भागातील मुलांना कबड्डीचे धडे

पुणे । अंघोळीची गोळी संस्थेने आयोजीत केलेल्या मामाच्या गावाला जाऊया उपक्रमात मंगळवारी कबड्डीपटू किशोरी शिंदेने अदिवासी भागातील मुलांना कबड्डीचे धडे दिले. विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात मुलांच्या खेळाबद्दलच्या प्रश्नांनाही तीने मोकळेपणाने उत्तरे दिली.

अंघोळीची गोळी संस्थेने आयोजीत केलेल्या मामाच्या गावाला जाऊया उपक्रमांतर्गत अकाेले तालुक्यातील अादिवासी भागातील मुलांना पुणे दर्शन घडवण्यात येत आहे. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असुन यावर्षी ११ मे ते १७ मे या दरम्यान हा उपक्रम राबवला जात आहे.

स्वप्न पहा आणि मोठे व्हा अशी यावर्षीच्या कार्यक्रमाची थिम यावेळी ठेवण्यात आली आहे. यामध्ये या भागातील मुलांनी पुण्यात येऊन फक्त सहलीचा आनंद घेण्यापेक्षा त्यांना विविध शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घडवल्या जात आहेत.

याचाच भाग म्हणुन काल किशोरी शिंदेने या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी तिने खेळात कारकिर्द कशी घडवावी याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले.

१० मुले आणि १० मुली सध्या या उपक्रमांतर्गत पुण्यात आले असुन यातील १० पैकी १० मुलींचा कबड्डी हा आवडता खेळ आहे. त्यामुळे किशोरीच्या मार्गदर्शनाने त्यांना या खेळाबद्दल सखोल माहिती मिळाली.

यावेळी बोलताना किशोरी म्हणाली, ” खेळात कारकिर्द घडवताना असंख्य अडचणी येऊ शकतात, परंतु त्यावर मात करत एक उत्तम कारकिर्द आपण घडवु शकतो. मी शिक्षण आणि खेळ यांचा मेळ घालत माझी कारकिर्द घडवली. त्यामुळे शिक्षणाला पर्याय नाही तसेच खेळातही चांगली कारकिर्द होऊ शकते. उत्तम कारकिर्द घडवणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीही मिळवता येते.”

याबद्दल बोलताना अंघोळीची गोळी संस्थेचे प्रमुख माधव पाटील म्हणाले, “किशोरीसारख्या एवढ्या मोठ्या खेळाडूचे या मुलांना मार्गदर्शन मिळणे मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या मुलांना या किंवा अन्य खेळातही चांगली कारकिर्द घडू शकते याबद्दल आत्मविश्वास निर्माण होईल. किशोरी सारख्या दिग्गज खेळाडूंनी पुढे येत जर अदिवासी भागातील खेळाडूंसाठी काही प्रयत्न केले तर नक्कीच भविष्यात आपल्याला मोठे खेळाडू याच भागातुन पहायला मिळु शकतात.”

यावेळी किशोरीच्या हस्ते या मुलांना टी-शर्ट्स देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास उगले यांनी केले तर रुपाली पाटील यांनी आभार मानले.