कबड्डी मास्टर्स दुबईमध्ये टीम इंडियात तब्बल ४ करोडपती खेळाडूंचा समावेश

दुबई | 22 जून पासून कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत ६ संघ सहभागी होत असून यात भारत- पाकिस्तानसारख्या कबड्डीमधील दिग्गज संघांचाही यात समावेश आहे. 

या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजय ठाकूरकडे सोपविण्यात आली आहे. २३ ते २६ नोव्हेंबर या काळात गोरगन, इराण येथे  एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेतही त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तेव्हा त्याने भारतीय संघाला विजय मिळवुन दिला होता.

दुबई मास्टर कबड्डी स्पर्धा २२ ते ३० जून या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, कोरिया या देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेकडे एशियन्स गेम्सची रंगीत तालिम म्हणुन पाहिले जात आहे.

या स्पर्धेत प्रो-कबड्डी २०१८साठी १ करोडपेक्षा जास्त बोली लागलेले तब्बल ४ भारतीय खेळाडू खेळत आहे. त्यात महाराष्ट्राचा रिशांक देवाडिगा, मोनू गोयात, राहुल चौधरी आणि दीपक हुडा यांचा समावेश आहे. तसेच १ करोड न मिळालेला परंतु सर्वात महागडा खेळाडू म्हणुन सुरिंदर नाडाकडे पाहिले जात आहे. त्याला प्रो कबड्डी लिलावात ७५ लाख मोजत हरियाणा स्टिलर्सने आपल्या संघात घेतले आहे.

प्रो कबड्डी लिलावात १ कोटी १५ लाख रुपये मिळालेल्या नितीन तोमरचा भारतीय तर १ कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीचा इराण संघात मात्र समावेश नाही.

प्रो कबड्डी लिलावात सर्वाधिक बोली लागलेले हे खेळाडू कबड्डी मास्टर्समध्ये खेळणार भारतीय संघाकडून-

मोनू गोयात: १ कोटी ५१ लाख रुपये (हरियाणा स्टीलर्स)
मोनू गोयात यंदाच्या लिलावात सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या प्रो कबड्डीच्या पाच पैकीं दोनच पर्वात खेळणार हा खेळाडू. दोन्ही पर्वात संघाचा दुसरा चढाईपटू म्हणून खेळणाऱ्या या खेळाडूने आपल्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर सगळ्याची मन जिंकली. प्रो कबड्डीमध्ये आतापर्यंत मोनूने ३९ सामने खेळले असून चढाईत २५० गुणांसह एकूण २६५ गुण मिळवले आहेत. तो डुआॅरडाय रेडमध्ये संघाला गुण मिळून देण्यास पटाईत आहे.

राहुल चौधरी: १ कोटी २९ लाख रुपये (तेलुगु टायटन्स)
कबड्डीमध्ये पोस्टर बॉय म्हणून ओळख असलेला खेळाडू म्हणजे राहुल चौधरी. मोनूनंतर सर्वाधिक बोली लागला दुसरा खेळाडू राहुलला एफबीएम कार्डचा वापर करत तेलुगु टायटन्सने राहुल पुन्हा आपल्या संघात कायम केला. जेव्हा प्रो कबड्डी ६ ला सुरुवात होईल तेव्हा त्याचा नावावर आणखी एक विक्रम लिहिला जाईल. प्रो कबड्डीच्या सर्व पर्वात एकाच संघाकडून खेळणार एकमेव खेळाडू असेल.
प्रो कबड्डीमध्ये चढाईत सर्वाधिक ६६६ गुण मिळवणार खेळाडू आहे. आतापर्यंत ७९ सामने खेळला असुन एकूण ७१० गुण मिळवले आहेत. राहुलच्या नावावर सर्वाधिक एकूण ३२ सुपरटेन आहेत.

दीपक हुडा: १ कोटी १५ लाख रुपये (जयपूर पिंक पँथर)
दीपकने मागील पर्वात पुणेरी पलटनला प्ले-ऑफमध्ये घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका पार पडली. एक मुख्य चढाईपटू असणारा दीपक चांगला पकडपटू आहे. आतापर्यंत दिपकने ८१ सामने खेळले असून एकूण गुणांच्या क्रमवारीत ५७७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात ५१४ चढाईत तर ६३ पकडीत गुण आहेत.

रिशांक देवडिगा: १ कोटी ११ लाख रुपये (युपी योद्धा)
प्रो कबड्डीतील लोकप्रिय महाराष्ट्राचा खेळाडू म्हणजे रिशांक. १ कोटीच्या पेक्षा जास्त बोली लागणार महाराष्ट्राचा पहिला खेळाडू. ११ वर्षीनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला अजिंक्यपद मिळवून देणारा महाराष्ट्र संघाचा कर्णधार.
प्रो कबड्डीमध्ये रिशांकने आतापर्यंत ८० सामने खेळले असून चढाईत ४४९ गुण तर एकूण ४९० गुण आहेत. डु ओर डाय स्पेशालिस्ट रेडर म्हणुन त्याची ओळख आहे.

कबड्डीच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या-

आरती बारी यांची मास्टर दुबई कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणुन निवड

मास्टर दुबई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघ जाहीर

प्रो-कबड्डी लिलावात महाराष्ट्राचे हे खेळाडू झाले मालामाल

४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख