…तर दाद मागायची कोणाकडे? – किशोरी शिंदे यांचा सवाल

मुंबई । महाराष्ट्राची माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू किशोरी शिंदेने आज महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या निवड समितीवर टीका करताना जर वरिष्ठ खेळाडूंनाच असा न्याय मिळत असेल तर दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न केला आहे.

काल महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा केली. या संघाची घोषणा अंदाजे दुपारी ३ वाजण्याच्या आसपास झाली परंतु नंतर पुन्हा नव्याने प्रसिद्ध केलेल्या यादीतून अचानक किशोरी शिंदे यांचे नाव वगळून स्नेहल शिंदे या खेळाडूला संघात स्थान देण्यात आले.

याबद्दल आज महा स्पोर्ट्सशी बोलताना किशोरी शिंदेने तीव्र नाराजगी व्यक्त केली. ” मला काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र्र कबड्डी असोशिएशनकडून अलिबाग येथे होणाऱ्या संघाच्या कॅम्पसाठी पत्र मिळाले. त्यानंतर मी सरावातही भाग घेतला. १२ खेळाडूंमध्ये माझी निवड कॅम्पच्या वेळी झाली होती. परंतु नंतर माझे नाव वगळण्यात आले. ” असे ती म्हणाली.

“विशेष म्हणजे स्नेहल शिंदेला कॅम्पसाठी संघटनेकडून अधिकृत पत्र मिळाले नव्हते. मला मी फिट नाही हे कारण देऊन संघातून वगळण्यात आल्याचे नंतर कळवण्यात आले. परंतु मला संघटनेकडून यापाठीमागचे खरे कारण काय हे जाणून घ्यायचे आहे. जर माझ्या सारख्या वरिष्ठ खेळाडूलाच संघटना न्याय देऊ शकत नसेल तर आम्ही नक्की जायचे कुठे? ” असाही प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

“मी तब्बल ९ वर्ष देशासाठी आणि गेली अनेक वर्ष राज्याकडून खेळली आहे. गेल्यावेळी मी हैद्राबाद येथे झालेल्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत संधी मिळाली नाही तरीही आक्षेप घेतला नाही. कारण कबड्डीमुळे एवढं काही मिळालं असताना एका स्पर्धेत निवड झाली नाही म्हणून टीका करणं अयोग्य ठरलं असत. परंतु सारखं सारखं तसंच घडत असेल तर गप्प तरी का बसावे?” असे कठोर टीकास्र् तिने सोडले.

“कऱ्हाड येथील निवड चाचणी स्पर्धेत माझी कामगिरी नक्कीच चांगली झाली नव्हती. त्यामुळे माझी हैद्राबाद येथील निवड झाली नसावी. परंतु अलिबाग येथे माझ्यासारख्या वरिष्ठ खेळाडूला कॅम्पमध्ये बोलवून पुन्हा संघात निवड न करणे किती योग्य आहे?” असाही प्रश्न तिने पुढे विचारला आहे.

किशोरी शिंदे ही महाराष्ट्राची वरिष्ठ खेळाडू असून तिने इंचियोन येथे झालेल्या अशियन गेम्समध्ये भारताकडून तर २०१५मध्ये ६३व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बेंगलोर येथे महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले होते. महिलांच्या प्रो कबड्डी लीगमध्येही तिने चमकदार कामगिरी केली होती.

तत्पूर्वी महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या संघनिवडीवरून सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कबड्डीप्रेमी संघनिवडीच्या सर्वच प्रकारामुळे चांगलेच नाराज असल्याचं समोर आलं आहे.