सुप्रीमो चषकाचे विजेतेपद कालिना-रायगड संघाकडे

मुंबई । कालिना – रायगड संघाने ठाणे- विजयदुर्गवर ३-० असा दिमाखदार विजय नोंदवून आमदार संजय पोतनीस आणि मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या सुप्रीमो चषक विभागीय फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.

मध्यंतराला एका गोलने आघाडीवर असलेल्या विजेत्यांनी उत्तरार्धात ठाणेकरांची आक्रमणे विफल ठरवत शेवटचा १० मिनिटात २ गोल करत आपल्या विजयाची मोहोर पक्की केली.

एअर इंडिया कॉलनी – कालीन येथील मैदानावर विद्द्युत प्रकाश झोतात खेळविल्या गेलेल्या स्पर्धेची सुमारे ३ हजार गर्दी प्रेक्षकांच्या साक्षीने अशा प्रकारे सांगता झाली.

त्याआधी तृतीय स्थान मिळविताना नवीमुंबई – पन्हाळगडने बोरिवली – विशाळगडचा पराभव केला. विजयी संघाला २ लाख रुपयांचा तर उपविजयी संघाला दीड लाखांचा पुरस्कार प्राप्त झाला. तृतीय स्थानावरील संघाला ७० हजारांचा लाभ झाला.

कालिनाने खेळाच्या २२व्या मिनिटाला पहिला गोल चढविला. उजवा विंगर मथायस कुटिन्होने चेंडू पेनल्टी एरियामध्ये क्रॉस केला. सामन्यात सर्वोत्तम ठरलेल्या कामरान सिद्दीकीने तो खाली पडू देत डाव्या पायाने अप्रतिम ‘हाफ – व्हॅली’ मारून गोल केला. यानंतर काही काळ वर्चस्व गाजविणाऱ्या कालीनाच्या गोलवर एका हेडरवर मथायसने हल्लाबोल केला पण चेंडू थोडासा बाहेर गेला.

ठाणेकरांनी उत्तरार्धात बरोबरीचे जोरदार प्रयत्न केले पण कालीनाचा गोलरक्षक विक्रम सिंगने जबरदस्त बचाव केला. अरविंदने पेनल्टी क्षेत्राच्या किंचित बाहेरून मारलेला राईट फुटर त्याने रोखला तेव्हा चेंडू आंतरराष्ट्रीय स्टीव्हन डायस कडे गेला. त्याने त्यावर तिरकस फटका मारला.

पण जमिनीवर पडलेल्या विक्रमने उसळी घेत तोही प्रयत्न विफल ठरविला. आणखी एका आक्रमणावर जेव्हा ठाणेकरांकडून धोका निर्माण झाला तेव्हा गर्दीमध्ये एका बचावपटूने चक्क गोल रेषेवरून चेंडू क्लियर केला.

एकीकडे प्रतिहल्ले करू लागल्यावर कालिना संघाने त्याच्यावर गोल साधून सामना आपल्या नियंत्रणाखाली आणचण्याच्या अनेक संधी गमविल्या. कामरान सिद्दीकीने तर एकदा तीन खेळाडूंना चकवत प्रतिस्पर्धीच बचाव भेदला पण त्याला पुढे सरसावणाऱ्या गोलरक्षकाला चकविणे जमले नाही.

शेवटी बदली अश्फाकच्या एका फ्री-किकवर संधी साधली. त्याचा ६०व्या मिनिटाला केलेला गोल तास महत्वाचा ठरला. त्यानंतर ‘ करो या मारो ‘ या जिद्दीने खेळणाऱ्या ठाणेकरांनी मग तुफानी हल्ले चढविताना बचावाकडे दुर्लक्ष केले व याचाच फायदा कामरणाने उठविला.

त्यानेच मग स्वतःच सुरु केलेल्या आक्रमणाची सांगता करताना एका अचूक प्लेसमेंटवर संघाचा तिसरा गोल केला.

अंतिम फेरीच्या या लढती करता भारतीय युवक संघाचा कर्णधार व ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराचा मानकरी तसेच प्रथितयश प्रशिक्षक शब्बीर आली आणि भारताचा कर्णधार व अर्जुन पुरस्कार विजेता आय एम विजयन असे बडे पाहुणे लाभले.

याशिवाय आंतरराष्ट्रीय गॉडफ्रे परेरा, युसूफ अन्सारी, हेनरी मेनेझेस आणि टोनी मार्टिन असे दिग्गज खेळाडूहि उपस्थित होते.

विशेष पुरस्कार : स्पर्धेत सर्वोत्तम – फारूक चौधरी (ठाणे)

सर्वोत्तम बचावपटू – प्रमोद मांडे (कालिना)

सर्वोत्तम स्ट्रायकर – कामरान सिद्दीकी (कालिना)

अंतिम सामन्यात सर्वोत्तम – कामरान सिद्दीकी (कालिना)

सर्वोत्तम मिड फिल्डर – विजित शेट्टे ( नवी मुंबई)

सर्वोत्तम गोलरक्षक – विक्रम सिंग (कालिना)

महत्त्वाच्या बातम्या –

मला त्यांनी साधा फोनही केला नाही याचे जास्त वाईट वाटले- ख्रिस गेल

हॉकी: हरेंद्र सिंग यांची पुरूष संघाच्या तर सुजर्ड मारीजने यांची महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

दादाच्या बॅटची काळजी घ्यायचा सचिन

पुण्यात चेन्नईचा बोलबाला, विजयाची शंभरी पार करणारा दुसराच संघ

द्रविडचा साधेपणा पुन्हा चर्चेत, प्रेक्षकांमध्ये बसुन पाहिला आयपीएलचा सामना