25000डॉलर पुणे ओपन महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत स्लोव्हेनियाच्या तामरा झिदनसेक हिला विजेतेपद

पुणे: नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एकेरीत  स्लोव्हेनियाच्या तामरा झिदनसेक हिने भारताच्या कारमान कौर थंडीचा 6-3, 6-4असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत स्लोव्हेनियाच्या अव्वल मानांकित तामरा झिदनसेकने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत चौथ्या मानांकित भारताच्या कारमान कौर थंडीचा 6-3, 6-4असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

हा सामना 1तास 29मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये तामराने आक्रमक खेळ करत पहिल्याच गेममध्ये कारमानची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत सामन्यात 2-0अशी आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या कारमानने आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर स्वतःची सर्व्हिस राखली.पण तामराची सर्व्हिस भेदण्यात कारमानला यश आले नाही. 

अखेर या सेटमध्ये तामराने आपले वर्चस्व कायम राखले व नवव्या गेममध्ये  कारमानची पुन्हा एकदा सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3असा विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. सामन्यात 5-4अशी आघाडीवर असताना 10गेममध्ये तामराने कारमानची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4असा विजेतेपदावर आपले नाव कोरले. यावेळी तामरा म्हणाली कि, हि स्पर्धा माझ्यासाठी खूप चांगली गेली असून या स्पर्धेत विजेतेपद पट कावल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. कारमान कौर थंडी एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि आजची तिच्यासोबतची लढत चुरशीची झाली. आगामी सोलापूर येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे तिने सांगितले.

स्पर्धेतील विजेत्या तामरा झिदनसेकला 50डब्लूटीए गुण व करंडक, तर उपविजेत्या कारमान कौर थंडीला 30डब्लूटीए गुण व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक नवनाथ शेटे आणि पुणे ओपनचे सहसचिव सुधीर धावडे आणि शिवाजी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी):
तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)(1)वि.वि. कारमान कौर थंडी(भारत)[4] 6-3, 6-4.