श्रीलंकेची कडवी झुंज अपयशी; भारताचे श्रीलंकेला व्हाईटवॉश

मुंबई। भारत विरुद्ध श्रीलंका संघात वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या तिसऱ्या टी २० सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवत श्रीलंकेला ३ सामन्यांच्या या मालिकेत ३-०ने व्हाईटवॉश दिला.

श्रीलंकेकडून सामन्यात चांगली झुंज बघायला मिळाली. पण भारताला जिंकण्यासाठी ७ चेंडूत ९ धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने षटकार ठोकून भारताचा विजय जवळ जवळ निश्चित केला; त्यानंतर एम एस धोनीने नेहमीप्रमाणे त्याच्या शैलीत चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

श्रीलंकेने दिलेल्या १३६ धावांचे आव्हान भारतीय संघ सहज पार करेल असे वाटले असतानाच भारताची सुरुवात खराब झाली. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा(२७) आणि के एल राहुलने(४) लवकर बळी गमावले.

त्यांच्यानंतर खेळायला आलेले श्रेयश अय्यर(३०) आणि मनीष पांडेने(३२) डाव सावरायचा प्रयत्न केला त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी रचली. हार्दिक पांड्याही(४) आज लवकर बाद झाला.

यानंतर कार्तिक(१८) आणि धोनीने(१६) आणखी पडझड न होऊ देता संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेकडून दशमंथा चमिरा(२२/२) आणि दसून शनका(२७/२) यांनी बळी घेतले.

तत्पूर्वी भारताकडून जयदेव उनाडकटने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात १५ धावा देत २ बळी घेतले. त्याच्याबरोबरच भारताकडून वॉशिंग्टन सुंदर(२२/१), पंड्या(२५/२), मोहम्मद सिराज(४५/१) आणि कुलदीप यादव(२६/१) यांनीही बळी घेतले.

श्रीलंकेकडून सदिरा समरविक्रमा(२१),असेला गुणरत्ने(३६) आणि दसून शनका(२९*) यांनी थोडीफार लढत दिली मात्र बाकी फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. त्यांनी २० षटकात ७ बाद १३५ धावा केल्या.

जयदेव उनाडकटला या सामन्याचा सामनावीर आणि या मालिकेचा मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय संघाने नाताळाच्या लाल टोप्या घालून विजय साजरा केला.