कविता देवी बनणार डब्लूडब्लूई स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय

कविता देवी ही डब्लूडब्लूईमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला ठरणार आहे. ही बातमी खुद्द जिंदर महाल यांनी दिली आहे. कविता देवी ही भारताकडून पॉवर लिफ्टर खेळाडू म्हणून खेळली आहे.

तिने २०१६ च्या साऊथ अशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यात तिने पोवारलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर ती डब्लूडब्लूईकडे वळली. डब्लूडब्लूईमध्ये पदार्पण करण्याआधी डब्लूडब्लूई मे यंग क्लासिक स्पर्धेत खेळली आहे.

शाळेत कब्बडीपटू असणाऱ्या कविताने डब्लूडब्लूई चॅम्पियन ग्रेट खलीकडून प्रशिक्षण घेतले आहे. तिची आता ओरलँडोमध्ये डब्लूडब्लूई परफॉर्मन्स सेंटरमध्ये प्रशिक्षण घेण्याची इच्छा आहे.

कविता देवी तिच्या डब्लूडब्लूई सहभागाविषयी म्हणाली “मी स्वतःला भाग्यवान समजते की मी डब्लूडब्लूई खेळणारी पहिली भारतीय महिला होणार आहे. मे यंग क्लासिक स्पर्धेत जगातील उत्कृष्ट महिला खेळाडूंशी खेळून खूप काही शिकता आले. आता मी डब्लूडब्लूईमध्ये भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहे.”

कविता देवीच्या डब्लूडब्लूईच्या सहभागाबद्दल केलेल्या ट्विटमध्ये जिंदर महाल म्हणाला “कविता आणि डब्लूडब्लूई तुम्ही इतिहास रचणार आहेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. कविता हि डब्लूडब्लूईमध्ये खेळणारी पहिली महिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.”

डब्लूडब्लूईचा भारत दौरा ८ आणि ९ डिसेंबरला होणार आहे. त्याचे प्रमोशन करण्यासाठी जिंदर महाल सध्या दिल्लीत आला आहे.