केदार जाधवच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरची वनडे संघात निवड !

भारताचा फलंदाज केदार जाधवला दुखापतीमुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील वनडे मालिकेला मुकावे लागणार आहे. भारतीय संघात केदार ऐवजी तामिळनाडूचा नवोदित खेळाडू वॉशिंग्टन सुंदरची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेली आहे.

केदारला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो वनडे मालिका खेळू शकत नाही. तसेच त्याची काही दिवसांपूर्वी २० डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुध्दच्याच टी २० मालिकेसाठीही भारतीय संघात निवड झालेली नाही.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला या वनडे आणि टी २० मालिकेसाठी विश्रांती दिल्याने रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. रोहितने केदार विषयी बोलताना सांगितले की केदार बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत आधीच झालेल्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी गेला होता परंतु त्याची ही दुखापत पूर्ण बरी होऊ शकली नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.

त्याचा बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेल्या वॉशिंग्टन सुंदरची या आधीच श्रीलंका विरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघातून खेळला आहे. या संघातून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती.

याबरोबरच तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता तसेच तो याच लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला होता. तसेच तो यावर्षीच्या तामिळनाडूच्या रणजी संघातूनही खेळला आहे.