फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत नील केळकर, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद

पुणे। नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात नील केळकर याने, तर मुलींच्या गटात प्रिशा शिंदे या खेळाडूंनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत मुलींच्या गटात चौथ्या मानांकीत प्रिशा शिंदेने तिस-या मानांकीत मृणाल शेळकेचा 5-4(5), 4-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. याआधीच्या उपांत्य फेरीत प्रिशाने रित्सा कोंडकरचा 6-0 असा एकतर्फी सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रिशा ही संस्कृती स्कुलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून सोलारीस क्लब येथे प्रशिक्षक रविंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या गटातील हे दुसरे विजेतेपद आहे.

मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात बिगरमानांकीत नील केळकरने दुस-या मानांकीत द्रोण सुरेश यांचा 4-1, 5-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. नीलने उपांत्य फेरीच्या लढतीत दहाव्या मानांकीत शौनक सुवर्णाचा 6-2 असा पराभव करत अंतिम फरीत प्रवेश केला. नील हा सिंबायोसीस शाळेत तिसरी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना क्लब येथे प्रशिक्षक मदन गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषीके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण फिनआयक्यूच्या क्रीडा समितीचे चेअरमन राजवीर सिंग व सुशिल जोसेफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे, अविनाश कोकणे, प्रनिल धनवे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 10 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
प्रिशा शिंदे(4) वि.वि.रित्सा कोंडकर 6-0
मृणाल शेळके(3) वि.वि. मेहक कपूर(2) 6-0

अंतिम फेरी:
प्रिशा शिंदे(4) वि.वि. मृणाल शेळके(3) 5-4(5), 4-1

10वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
नील केळकर वि.वि. शौनक सुवर्णा(10) 6-2
द्रोण सुरेश(2) वि.वि. अयान शेट्टी(5)6-5(6)

अंतिम फेरी:
नील केळकर वि.वि. द्रोण सुरेश(2) 4-1, 5-3