ISL 2017: केरळा ब्लास्टर्सला पुण्याविरुद्ध फॉर्म मिळविण्याची आशा

कोची: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गुरुवारी येथील नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्सची एफसी पुणे सिटीविरुद्ध लढत होत आहे. ब्लास्टर्सने मुख्य प्रशिक्षक रेने म्युलेस्टीन यांच्याबरोबरील करार एकमेकांच्या सहमतीने संपविला आहे. यानंतरही ब्लास्टर्ससमोरील प्रेरणा कमी झालेली नसेल.

म्युलेस्टीन यांनी मँचेस्टर युनायटेडमध्ये अॅलेक्स फर्ग्युसन यांचे सहाय्यक म्हणून काम केले होते. गतमोसमात अंतिम फेरी गाठलेल्या ब्लास्टर्सने यंदा जेतेपदाच्या आशेने म्युलेस्टीन यांना करारबद्ध केले होते, पण पाठोपाठ प्रतिकूल निकाल लागल्यामुळे त्यांना आधीच निरोप देण्यात आला.

ब्लास्टर्सला पहिल्या सात सामन्यांत एकच विजय मिळविता आला आहे. हा संघ फॉर्मसाठी झगडतो आहे. त्यांच्या निष्ठावान चाहत्यांनी मात्र संघाला भक्कम पाठिंबा सुरू ठेवला आहे. त्यामुळे ब्लास्टर्स पारडे फिरविण्याची शक्यता फेटाळून लावता येणार नाही. ब्लास्टर्सचे सहाय्यक प्रशिक्षक थांगबोई सिंगटो यांनी सांगितले की, मोसमाला प्रारंभ झाला तेव्हा प्रत्येक संघाला चांगला खेळ करायचा होता.

आता निकाल सर्वांसमोर आहेत. आम्ही केरळा ब्लास्टर्स आहोत आणि आमच्याकडे सर्वोत्तम चाहते आहेत. आता गुरुवारचा सामना सर्वाधिक महत्त्वाचा आहे. आम्हाला चाहत्यांसाठी अनुकूल निकाल साधावा लागेल. दक्षिणेतील दोन डर्बींमध्ये ब्लास्टर्सला अपेक्षित निकाल मिळविता आले नाहीत. त्यांना चेन्नईयीन एफसीविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले, तर बेंगळुरू एफसीविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

हे म्युलेस्टीन यांच्या विरोधात गेले. त्यांच्यासारखे मातब्बर प्रशिक्षक गेले असले तरी ब्लास्टर्सच्या धोरणात बदल होण्याची शक्यता कमी आहे. सिंगटो यांनी सांगितले की, नियोजनाचा विचार केल्यास जे करीत आहोत ते कायम ठेवावे लागेल, पण आम्ही गोल करणे आणि प्रतिस्पर्ध्याचा गोल होऊ न देणे महत्त्वाचे असेल. आमचे खेळाडू व्यावसायिक आहेत. खेळ कसा करायचा याची त्यांना कल्पना आहे.

ब्लास्टर्सला मैदानावर आणि मैदानाबाहेर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी एफसी पुणे सिटीची स्थिती काहीशी वेगळी आहे. पुण्याने बाहेरील मैदानावर चमकदार फॉर्म प्रदर्शित केला आहे. एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्याविरुद्ध पुण्याने उत्तम निकाल साकार केले. यानंतरही आपला संघ गाफील राहणार नाही, असे सहाय्यक प्रशिक्षक व्लादिचा ग्रुजीच यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक सामना अवघड असतो.

ब्लास्टर्सचा संघ या घडीला कदाचित चांगल्या स्थितीत नसेल, पण आम्हाला आमच्या खेळावर लक्ष केंद्रीत ठेवावे लागेल आणि कोणत्याही गोष्टीला कमी लेखून चालणार नाही. पुणे सिटी संघाला मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविच यांची उणीव जाणवेल. त्यांना चार सामन्यांसाठी निलंबीत करण्यात आले आहे.