केरला ब्लास्टर्स समोर एटीकेचे आज तागडे आव्हान

आएसएल भारतातील फुटबाॅलला नवीन उंचीवर घेऊन जाणार याबद्दल कोणालाच तीळमात्र शंका नव्हती आणि या आधीच्या ३ मौसमात प्रेक्षकांच्या संख्येत होणाऱ्या वाढीने हे सिद्ध सुद्धा झाले.

या ४ थ्या मौसमात आएसएलने २ संघ अधिक समाविष्ट करुन घेतल्याने हा अधिकच भव्य आणि उत्साहवर्धक होईल. आणि याची सुरुवात करणार आहेत ३ मौसमात २ वेळेस अंतिम सामन्यात एकमेकांसमोर खेळणारे केरला ब्लास्टर्स आणि ॲटलेटिको डी कोलकाता.

सचिनचा केरला ब्लास्टर्स तर सौरभ गांगुलीचा ॲटलेटिको डी कोलकाता एकमेकांसमोर असेल तर हे दोन्ही माजी दिग्गज खेळाडू सोबतच भारतासाठी सलामीला यायचे ते आज परस्परविरोधी संघात असतील. केरलाचा एटिके समोरचा रेकाॅर्ड हा आयएसएलच्या इतर संघांपेक्षा खराब आहे.

८ सामन्यात फक्त एकदा त्यांना विजय मिळवता आला आहे तर ५ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे तर २ वेळेस सामना अनिर्णित सुटला. त्या ५ पराभवात दोनदा त्यांना अंतिम सामन्यात पराभव स्विकारुन उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते.

केरलाने आयएसएल मध्ये सर्वाधिक १९ तर एटिकेने सर्वात कमी म्हणजे ११ सामने गमावले आहेत. तसेच सर्वाधिक सामने जिंकायचा विक्रम एटिके बरोबरच चेन्नईच्या नावे आहे त्यांनी १९ सामन्यात विजय मिळवला आहे.

आज एटिके विरुद्ध सामना जिंकून केरला आपली या मौसमातील विजयी सुरुवात करेल आणि मागील पराभवाचा वचपा काढेल का एटिके आपले केरला समोरचे वर्चस्व पुन्हा सिद्ध करेल हे पाहण्यास सर्व उत्सुक आहेत.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)