ISL 2018: पुण्याविरुद्ध ब्लास्टर्सची महत्वाची लढत

पुणे:  हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) केरळा ब्लास्टर्सची शुक्रवारी एफसी पुणे सिटीविरुद्ध श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात लढत होत आहे.

ब्लास्टर्सने डेव्हिड जेम्स यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून पाचारण केले. त्यांच्या पुनरागमनानंतर ब्लास्टर्सने तीन सामन्यांत अपराजित मालिका राखली.

त्यानंतर त्यांना सलग दोन पराभव पत्करावे लागले. मग दिल्ली डायनॅमोजला हरवून हा संघ सावरला. इंग्लंडच्या जेम्स यांना तसेच ब्लास्टर्सच्या चाहत्यांना संघाच्या कामगिरीत चढ-उतार पाहावे लागले आहेत.

पहिल्या चार क्रमांकांत स्थान मिळविण्यापासून हा संघ दोन गुणांनी मागे आहे. बाद फेरीच्या शर्यतीत असलेल्या इतर कोणत्याही संघाच्या तुलनेत ब्लास्टर्सचे सामने जास्त झाले आहेत. हाच एक प्रतिकुल मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर ब्लास्टर्सला भरात असलेल्या पुणे सिटीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

दुसरीकडे पुणे सिटी संघ सुद्धा इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न बघतो आहे. गेल्या दोन सामन्यांत पुण्याने विजय मिळविले आहेत. गेल्या सहा सामन्यांत एकमेव पराभवामुळे त्यांची कामगिरी भक्कम होत आहे.

रँको पोपोविच यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ धोकादायक प्रतिआक्रमण रचतो. त्यांचे फिनिशिंग भेदक असते. स्पर्धेत त्यांचा बचाव दुसऱ्या क्रमांकाचा आहे. त्यांच्याविरुद्ध केवळ 12 गोल झाले आहेत.

जेम्स यांनी सांगितले की, गोव्याविरुद्धचा पराभव फार कठोर ठरला. त्यामुळे सलग सहा सामने जिंकण्याची वेळ आमच्यावर आली. अशावेळी दिल्लीवरील विजय अत्यंत महत्वाचा होता. खेळाडूंचा आत्मविश्वास चांगला होता. त्यामुळे उरलेले सर्व सामने जिंकण्याच्या मोहीमेत आम्ही एक पाऊल पुढे टाकले.

पुणे सिटीचा गोलरक्षक विशाल कैथ याने नऊपैकी चार सामन्यांत एकही गोल न पत्करता क्लीन शीट राखली आहे. त्याने नेटच्या दिशेने आलेल्या फटक्यांचा 21 वेळा बचाव केला आहे.

त्याच्याविषयी विचारले असता जेम्स म्हणाले की, विशाल हा प्रतिभासंपन्न तरुण खेळाडू आहे. त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. त्याचवेळी त्याच्या संदर्भातील काही बाबींचा फायदा उठविण्याचा आमचा प्रयत्न असेल.

करारबद्ध केलेला स्टार खेळाडू दिमीतार बेर्बातोव याची सरावातील कामगिरी अप्रतिम असल्याचे जेम्स यांनी नमूद केले. इतर कोणत्या खेळाडूंना करारबद्ध करणार या प्रश्नावर मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ब्लास्टर्सला हरविल्यास पुणे सिटी गुणतक्त्यात तात्पुरती आघाडी घेऊ शकतो. मुक्तपणे गोल करणाऱ्या या संघाचे मार्सेलिनीयो आणि एमिलीयानो अल्फारो हे खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. त्यांना रोखणे अवघड असेल. पोपोविच संघाविषयी आनंदी असले तरी त्यांनी आणखी सरस खेळाची अपेक्षा व्यक्त केली.

ते म्हणाले की, लोक आमच्या कामगिरीविषयी चर्चा करीत असतील तर ते चांगले आहे, पण चांगला खेळ होण्यासाठी आक्रमण आणि बचावात संतुलन साधले पाहिजे असे मी नेहमीच म्हणालो आहे.

होय, आमची वाटचाल चांगली होत आहे, पण आम्ही अजून पुरेसा चांगला खेळ करू शकलेलो नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. फुटबॉलच्या खेळात तुम्हाला आठवड्यामागून आठवडे चांगल्या खेळाची पुनरावृत्ती करावी लागते. आमची मागील कामगिरी चांगली आहे, पण आता यापुढील खेळ महत्त्वाचा असेल.

संघात खूप बदल करायला आवडत नसल्याचे पोपोविच यांनी नमूद केले. अल्फारो आतापर्यंतचे सर्व बारा सामने खेळला आहे. त्याला गरज असेल तरच विश्रांती देऊ, पण आतापर्यंत तसे घडलेले नसल्यामुळे त्याला खेळवित राहू असे त्यांनी सांगितले. काही खेळाडूंना किरकोळ दुखापती झाल्यामुळे आळीपाळीने खेळविणे भाग पडेल असे त्यांनी सुचित केले.

ब्लास्टर्स या खडतर सामन्याला सामोरे जाताना पुणे सिटी संघातील असे बदल आपल्या पथ्यावर पडतील अशी आशा बाळगून आहे.