इंद्रायणी, परशूरामियन्स अ, फिनायक्यु, एनवायएफए उपांत्य फेरीत

पुणे। केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत झालेल्या फुटबॉलच्या सामन्यात इंद्रायणी, परशूरामियन्स अ संघ, फिनायक्यु,एनवायएफए संघांनी आपले विजय साकारत उपांत्य फेरीत मजल मारली.

उपांत्यपुर्व फेरीचा पहिला सामना इंद्रायणी विरुद्ध पिफा फुटबॉल संघात रंगला. या सामन्यात इंद्रायणी संघाच्या शुभम गायकवाड याने सामन्याच्या 25 मिनीटाला पहिला गोल साकारला. तर करमेंद्र सरोज याने लगेचच 26 मिनीटाला दुसरा गोल इंद्रायणी संघासाठी केला. त्यानंतर इंद्रायणी संघाच्या फुटबॉलपटूंनी जोरदार आक्रमण करत वारंवार गोल केले. त्यामध्ये जगतराज याने 40 मिनीटाला, आशिष सिंग याने 44 मिनीटाला, जगतराज याने पुन्हा 57 मिनीटाला, आणि कुंदन सिंग याने 69 व्या मिनीटाला असे तब्बल 6 गोल केले. इंद्रायणी संघाचा गोलकिपर प्रियतोष चतुर्वेधी याने शानदार गोलरक्षण करत प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल साकारू दिला नाही. त्यामुळे हा सामना इंद्रायणी संघाने 6-0 असा जिंकला. तर पिफा संघाच्या तपन मेहता, सुनिल पवार, गौरव घोरपडे यांना एकही गोल करता आला नाही. तर पिफा फुटबॉल संघाचा राधेशाम यालाही साजेसी कामगिरी करता आली नाही.

दुसरा सामना परशूरामियन्स अ संघ विरुद्ध डेक्कन इलेवन क संघात रंगला. या सामन्यात परशूरामियन्स अ संघाच्या सोहेल शेख याने 36 मिनीटाला पहिला गोल केला. तर त्याला उत्तर देताना डेक्कन इलेवन क संघाच्या गौरव बनिक याने 38 मिनीटाला पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच सोहेल शेख याने 63 मिनीटाला दुसरा गोल करत परशूरामियन्स अ संघाला आघाडी मिळवून दिली. तर त्याला साथ देताना निखील नारायण याने 71 मिनीटाला तिसरा गोल करत परशूरामियन्स अ संघाला विजय मिळवून दिला. तर डेक्कन इलेवन क संघाचा गोलकिपर अश्विन चौधरीला साजेसी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे हा सामना परशूरामियन्स अ संघाने 3-1 असा जिंकला. परशूरामियन्स अ संघाचा गोलकिपर रोहण फासगे याने शानदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलांचे आक्रमण अडविले. रोहण फासगे हा राष्ट्रीय फुटबॉलपटू आहे.

तिसरा सामना फिनायक्यु विरुद्ध स्निगमय एफ.सी संघात झाला. यामध्ये स्निगमय एफ.सी संघाचा मुझफर शेख याने सामन्याच्या पहिल्या 10 मिनीटाला पहिला गोल केला. त्याला उत्तर देताना फिनायक्यु संघाचा सुरज थापा याने 20 मिनीटाला गोल करत बरोबरी केली. त्यानंतर फिनायक्यु संघाचा आदर्श रोटलू याने 41 मिनीटाला दुसरा गोल करत आघाडी मिळविली. त्यानंतर फिनायक्यु संघाच्या प्रकाश थोरात याने 44 मिनिटाला आणि ईश्वर क्षिरसागर याने 63 मिनीटाला गोल केले. तर त्याला उत्तर देताना स्निगमय एफ.सी संघाचा सुमित भंडारी याने 58 मिनीटाला गोल केला. मात्र त्यानंतर स्निगमय एफ.सी संघाच्या एकाही फुटबॉलपटूला गोल करता आला नाही त्यामुळे हा सामना फिनायक्यु संघाने 4-2 अशा फरकाने जिंकला. फिनायक्यु संघात श्रीकांत मोलेनगिरी याने सर्वोत्तम पास दिले. श्रीकांत मोलेनगिरी हा राष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. फिनायक्यु संघाचा गोलकिपर कमलेश सावंत याने सर्वोत्तम गोलरक्षण केले.

त्यानंतरचा चौथा सामना डेक्कन इलेवन अ संघ विरुद्ध एनवायएफए संघात रंगला. या सामन्यात एनवायएफए संघाच्या विकी राजपुत याने 18 मिनीटाला पहिला गोल केला. तर अथर्व निवदेकर याने 64 मिनीटाला दुसरा गोल केला. तर डेक्कन इलेवन अ संघाचे राहुल कडलक, ऋत्विक भारद्वाज हे अपयशी ठरले. त्यामुळे हा सामना एनवायएफए संघाने 2-0 असा जिंकला. एनवायएफए संघाचा गोलकिपर शिवम पेडणेकर याने सर्वोत्तम कामगिरी केली. तर डेक्कन इलेवन अ संघाचा गोलकिपर शेशाद्री शिरोळकर हे अपयशी ठरले.

केसरी करंडकाचा संक्षिप्त निकाल

दिवस सातवा ; उपांत्यपुर्व फेरी

सामना 1 ला : इंद्रायणी विरुद्ध पिफा फुटबॉल संघात रंगला.

निकाल : इंद्रायणी संघाने 6-0 असा जिंकला.

सामना 2 रा : परशूरामियन्स अ संघ विरुद्ध डेक्कन इलेवन क संघात रंगला.

निकाल : हा सामना परशूरामियन्स अ संघाने 3-1 असा जिंकला.

सामना 3 रा : फिनायक्यु विरुद्ध स्निगमय एफ.सी संघात झाला.

निकाल : फिनायक्यु संघाने 4-2 अशा फरकाने जिंकला.

सामना 4 था : डेक्कन इलेवन अ संघ विरुद्ध एनवायएफए संघात रंगला.

निकाल : एनवायएफए संघाने 2-0 असा जिंकला.

उपांत्यफेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक

1) इंद्रायणी विरुद्ध एनवायएफए : सकाळी 9;00 वाजता

2) परशूरामियन्स अ संघ विरुद्ध फिनायक्यू : सकाळी 10.30 वाजता